Coronavirus in Yawatmal; कोरोना पाॅझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब सर्वात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:30 AM2021-04-29T09:30:00+5:302021-04-29T09:30:02+5:30
Yawatmal news Diabetes, hypertension कोरोना विषाणू हा संसर्ग झाल्यानंतर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीलाच सर्वाधिक धोका पोहोचवत आहे. अनेकांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू हा संसर्ग झाल्यानंतर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीलाच सर्वाधिक धोका पोहोचवत आहे. अनेकांना मृत्यूच्या दारात नेण्याचे काम मधुमेह व उच्च रक्तदाब या आजाराने केले आहे. कोरोनाचे वेळीच निदान केले व योग्य उपचार घेतल्यास यातून व्यक्ती पूर्णत: बरा होऊ शकतो. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ६७२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मधुमेह व उच्च रक्तदाब हा आजार असणारे अनेक रुग्ण आहेत. त्यांना कोरोना काळात आपल्या जुन्या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बरेचदा मधुमेह असूनसुद्धा त्याची औषधी योग्य पद्धतीने घेतली जात नाही. उच्च रक्तदाबाच्या गोळ्याही अनियमित घेतल्या जातात. यामुळे कोरोनाची जोखीम अधिक वाढते. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजार ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ५६४ म्हणजेच ५० टक्के मृत्यू हे मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचे आहे. इतर आजारांनी ग्रस्त रुग्णाचे शरीर कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रसाराला चांगला प्रतिसा देते. यातून रुग्णाची प्रकृती खालावत जाते. प्रसंगी जीविताचा धोकाही सर्वाधिक असतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचाराबाबत अजूनपर्यंत ठोस असे औषध उपलब्ध नाही. लक्षणे पाहून डाॅक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळे इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या विशेष करून मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?
मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये, त्यांच्यासाठीही मास्क, सॅनिटायझर-हात धुणे व शारीरिक अंतर ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. सोबतच डाॅक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, आपल्या आजाराची औषधी नियमित घ्यावी तरच अतिजोखमीतील व्यक्ती सुरक्षित राहू शकतो.