अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवक आक्रमक
By admin | Published: March 1, 2017 01:17 AM2017-03-01T01:17:40+5:302017-03-01T01:17:40+5:30
नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आक्रमक पावित्रा घेतला.
सत्ताधारी अगतिक : नामुष्की टाळण्याचा प्रयत्न
यवतमाळ : नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आक्रमक पावित्रा घेतला. शहरासाठी २३ कोटी ७५ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहापुढे ठेवण्यात आला. सुरुवातीलाच अर्थसंकल्पाची प्रत एक दिवस अगोदर मिळाल्यावरून सत्ताधारी भाजपाच्या गटनेत्यांनी आक्षेप घेतला. यावर मुख्याधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. येथून अर्थसंकल्पीय सभा भरकटली ती शेवटपर्यंत मूळ पदावर आलीच नाही. शेवटी मागील वर्षीची नामुष्की टाळण्यासाठी बजेट मंजुरीचा प्रयत्न सुरू होता.
नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. अर्थसंकल्पाला सभागृहापुढे ठेवण्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सदस्यांनी सूचविलेल्या दुरुस्त्या अंतिम अर्थसंकल्पात समाविष्ठ झाल्याच नाही. यावरून भाजपा नगरसेवकांनी व विषय समिती सभापतींनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. याच गोंधळात अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होते. दरम्यान काँग्रेस गटनेत्याने अर्थसंकल्पावर आक्षेप घेत नगरसेवकांच्या सूचनांचाही त्यात समावेश केला जावा, अशी मागणी केली. तसेच लेखी स्वरूपाचे निवेदनही नगराध्यक्ष व सीओंना सुपूर्द केले. ग्रामीण भागातील मालमत्ता मूल्यांकनाचा मुद्दा पुन्हा सभेत गाजला. यावरच बराच वेळ खर्च झाला. तसेच शहरातील दुकान गाळ्याचे भाडे मूल्यांकन व निर्धारण का झाले नाही यावरून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अर्थसंकल्पीय सभा असली तरी अवांतर मुद्यांवरच सभागृहात चर्चा सुरु होती. याच स्थितीत अर्थसंकल्पाचे वाचन केले जात होते. काही मुद्यांना विरोध तर दुरुस्त्या सुचवून बजेट मंजुरीचा प्रयत्न झाला. वृत्तलिहिपर्यंत सभा सुरूच होती. (कार्यालय प्रतिनिधी)