आता इंग्रजीतही होणार ‘ळ’चा अचूक उच्चार; यवतमाळच्या डॉक्टरांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 07:00 AM2021-08-31T07:00:00+5:302021-08-31T07:00:02+5:30
Yawatmal News मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये सर्रास ‘ल’ असे वापरले जाते. मात्र, या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच करावा, तो कशा पद्धतीने करावा याविषयी यवतमाळ येथील एका डॉक्टरांनी सखोल संशोधन केले आहे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये सर्रास ‘ल’ असे वापरले जाते. इंग्रजीची ही भाषिक गरिबी मराठीचे भाषासौष्ठव गेल्या कित्येक वर्षांपासून बिघडवित आहे. मात्र, या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच करावा, तो कशा पद्धतीने करावा याविषयी यवतमाळ येथील एका डॉक्टरांनी सखोल संशोधन केले आहे. या संशोधनाला मान्यता मिळाली असून, आता इंग्रजी भाषेतही यवतमाळ, पुरणपोळी, माळी, टाळी, असे मराठी शब्द अचूक लिहिण्याची आणि उच्चारण्याची सोय झाली आहे. (The correct pronunciation of ‘l’ will now also be in English; Research of doctors of Yavatmal)
डॉ. राजू श्यामराव रामेकर, असे या डॉक्टरांचे नाव आहे. मातृभाषेविषयी प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या डाॅ. रामेकर यांनी इंग्रजीमध्ये होणारी मराठीची मोडतोड थांबविण्याचा चंग बांधला. त्यासाठी ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये ‘ळ’ असेच लिहावे यावर संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाला नुकताच भारत सरकारकडून कॉपीराईट मिळाला आहे. मराठीसह तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम या भाषांमध्येही ‘ळ’ हे व्यंजन महत्त्वपूर्ण आहे. मात्र, या भाषेतील अनेक शब्द इंग्रजीमध्ये अनुवादित करताना किंवा उच्चारताना ‘ळ’ऐवजी ‘ल’ वापरला जातो. त्यातून मूळ भाषेचे सौंदर्य डागाळते. मात्र, आता डॉ. राजू रामेकर यांनी केलेल्या संशोधनानुसार इंग्रजी भाषेत ‘ळ’ लिहिता-बोलता येणार असल्याने या सर्व भाषांचा जागतिक पातळीवरील सन्मान राखणे शक्य होणार आहे.
इंग्रजीत असा लिहावा ‘ळ’
डॉ. राजू रामेकर यांनी इंटरनॅशनल अल्फाबेट ऑफ संस्कृत ट्रान्सलिटरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार इंग्रजी भाषेत ‘ळ’ कसा लिहावा, याचे संशोधन करून पर्याय सुचविला. तो पुढीलप्रमाणे, मराठीचा ‘ळ’ इंग्रजीत लिहिताना ‘एल’ हे इंग्रजी अक्षर वापरले जाते. मात्र, आता इंग्रजीमध्ये ‘ळ’ लिहिताना ‘एल’ लिहून त्याच्या खाली आडवी रेषा काढावी लागेल. अधोरेखित केलेल्या ‘एल’चा उच्चार ‘ळ’ असा करावा लागेल. (मराठी ‘ळ’ : इंग्रजी ‘L’).
जातीच्या दाखल्यासह अनेक कागदपत्रात घोळ
‘ळ’चा उच्चार इंग्रजीत करता येत नसल्याने महाराष्ट्रात अनेकांचे जातीचे दाखले चुकलेले आहेत. अनेकांच्या टीसीवरील नाव चुकलेले आहे. अनेकांना ऐनवेळी रेल्वे तिकिटाचे आरक्षण नाकारले गेले आहे. अनेकांच्या शैक्षणिक सवलतींवर गदा आली आहे, तर काही जातींमध्ये ‘ळ’, ‘ड’ आदींच्या उच्चारणावरून आणि लेखनावरून मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र, आता प्रत्येक कागदपत्रात ‘ळ’चे लेखन ‘ल’ किंवा ‘ड’ असे न होता ‘ळ’ असेच करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
का केले संशोधन?
मूळ यवतमाळ येथील रहिवासी असलेले डॉ. राजू रामेकर गेल्या २० वर्षांपासून तेलंगणातील आदिलाबाद येथे स्थायिक झाले आहेत. ते मूळ मराठी भाषिक असताना व्यवसायानिमित्त त्यांना अनेकदा व्यवहार इंग्रजीतून करावा लागतो. त्यावेळी ‘ळ’चा उच्चार किंवा लेखन चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेषत: आपले मूळ गाव यवतमाळचा उच्चार यवतमाल, यवतमेल असा होेणे त्यांना खटकू लागले. त्यातूनच त्यांनी हे संशोधन सुरू केले.
प्रत्येक मराठी शब्दाची, मराठी नावाची, मराठी गावाची आणि वस्तूची मूळ ओळख कायम राहावी यासाठी ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीत अचूक लिहिण्याबाबत संशोधन केले. त्याचे कॉपीराईटही केले. आता इंग्रजीत ‘ळ’ लिहिता येणारे हे डिझाईन वापरण्यासाठी की-बाेर्ड, टाईपरायटरमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृतीसह भारत सरकारने अधिसूचना जारी करावी.
-डॉ. राजू रामेकर, संशोधक, आदिलाबाद