‘बांधकाम’च्या भ्रष्ट कारभाराने विकासकामांचे मातेरे; रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चूनही दुरवस्था कायम
By विशाल सोनटक्के | Published: October 4, 2023 01:28 PM2023-10-04T13:28:08+5:302023-10-04T13:28:39+5:30
कामे मॅनेज केली जात असल्याचा वारंवार होत आहे आरोप
विशाल सोनटक्के
यवतमाळ : येणाऱ्या काळात निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने जिल्ह्यातील विकासकामांसाठी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत आहेत. मात्र बांधकाम विभागाच्या गोंधळी कारभारामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांमध्ये संताप कायम असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक कामे ठराविक कंत्राटदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून मॅनेज केली जात असल्याची चर्चा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवडा अशी तीन विभागीय कार्यालये आहेत. मात्र या तीनही कार्यालयांतर्गतच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीसाठी तर जणू काही संगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे. येथील कारभार अनेक महिन्यांपासून प्रभारीवरच हाकला जात असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे.
यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता अडसुळे यांनी अनेक महिने पांढरकवड्याचा प्रभार हाकला. त्यांच्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य कामे झाल्याचा आरोप होत होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी एकनाथ टिकले यांची पांढरकवड्याला कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, टिकले यांना रुजू होऊ देण्यामध्येच अनेक अडथळे आणले गेले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये अनिल येरकडे यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. त्यांचीही मोठ्या प्रमाणात कोंडी करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागातीलच काहींनी केला होता.
जून महिन्यामध्ये नांदेड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील संजय साहुत्रे यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. ते रुजूच झाले नाहीत. त्यामुळे या विभागाचा प्रभार पुन्हा अडसुळे यांच्याकडे आला. त्यानंतर सध्या पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार दादासाहेब मुकडे यांच्याकडे आहे. मुकडे यांच्या काळातीलच हाॅटमिक्स निविदेचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले. याबाबत ना वरिष्ठांनी विचारणा केली, ना काही कारवाई झाली. आता यवतमाळच्या कार्यकारी अभियंता पदासोबत मुकडे हे पांढरकवडा विभागाचाही प्रभार सांभाळत आहेत. महिन्यातून काही दिवस ते पांढरकवडा वारी करीत असल्याने या भागातील विकासकामांचा वाली कोण, असा प्रश्न नागरिकातून केला जात आहे.
पुसद विभागाची तऱ्हा आणखी वेगळी आहे. मध्यंतरी तेथेही जीओ टॅगिंगच्या विषयावरून गदारोळ माजला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुठल्याही कामाला जीओ टॅगिंगची अट नव्हती. मात्र अशी अट येथे घालण्यात आली होती. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता पुजारीही याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नव्हत्या.
पालकमंत्र्यांनी खडसावूनही सुधारणा नाहीच
पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दिग्रस-दारव्हा या महामार्गाचे काम चार वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला सोयरसुतक नाही. कामासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी चक्क दुचाकीवरून ३० किमीची रपेट मारून या कामांचा ऑन दी स्पाॅट पंचनामा केला होता, तसेच सदर कामाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली होती. विशेष म्हणजे याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता शेलार यांच्यासह कार्यकारी अभियंता कथळकर हेही उपस्थित होते. सदर कामे नव्याने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. यावरूनच राष्ट्रीय महामार्गाची कामेही जिल्ह्यात कुठल्या दर्जाची सुरू आहेत, याचा प्रत्यय येतो.
स्टेडियममध्ये उभारलेल्या बॅडमिंटन कोर्टचीही दुरवस्था
जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत नेहरू स्टेडियम परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून बॅडमिंटन कोर्टची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी निर्माण होईल, अशी यवतमाळकरांची अपेक्षा होती. मात्र याही कामाला भ्रष्ट कारभाराने पोखरले आहे. तळमजल्यावरील दोन कोर्टबाबत तक्रारी आहेत. मध्यंतरी पाण्याने मॅट खाली लाकूड फुगले होते. क्रीडा विभाग याबाबत बांधकाम विभागाकडे बोट दाखविते.