कापसाले मारला हो बोंडअळीने डोळा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:07 PM2019-08-29T22:07:00+5:302019-08-29T22:07:31+5:30
गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
पोळा रे पोळा
कास्तकाराचा पोळा
या पोळ्यामंदी
झाले अवघे गोळा
कापसाले मारला हो
बोंडअळीने डोळा
एक नमन कवडा पार्वती
हर हर महादेवऽऽऽ
अशा झडत्या यंदाचा पोळा दणाणून सोडण्यासाठी तयार आहेत. गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत.
पोळा दरवर्षीच येतो. दरवर्षीच झडत्याही दणाणतात. पण दरवर्षीच्या झडत्या असतात नव्या कोºया. एखाद्या साली पीक चांगलं असते, तर एखाद्या साली शेती बरबाद झालेली असते. यंदाही कापसावर बोंडअळीने हल्ला चढविलेलाच आहे. त्याचे दु:ख व्यक्त करणारी ही झडती आर्णी तालुक्यातील जवळाचे अ.भा.ठाकूर यांनी तयार ठेवली आहे. पण आपलंच दु:ख कुरवाळत बसणारा शेतकऱ्याचा स्वभाव नाही. यंदाच्या पावसाने कोल्हापूरवासीयांची जी धुळधाण उडविली, त्यावरही झडत्यांतून भाष्य होणार आहे.
पाणी रे पाणी
आभायातलं पाणी
आलं जोरजोरात म्हणून
कोल्हापूरची धुयधाणी
एक नमन कवडा पार्वती
हर हर महादेवऽऽऽ
पण हा उत्साह साजरा करतानाही तो सरकारच्या धोरणांवर आसूड ओढल्याशिवाय राहात नाही. यंदाही सरकारला वेसण घालणारी अशीच एक झडती गुंजणार आहे...
पैसा रे पैसा सरकारचा पैसा
या महागाईमंदी
कास्तकार जगन बे कैसा
शेतमालाले भाव देऊन
फुलवा शेतकरी कमळाजैसा
एक नमन कवडा पार्वती
हर हर महादेवऽऽऽ
यवतमाळ शहरात सौंदर्यीकरण करताना कृषिसंस्कृती जपण्यात आली. लोहारा चौकात आकर्षक भव्य असा नंदी साकारण्यात आला आहे. याच नंदीच्या मागील बाजूला कमलेश्वराचे प्राचीन मंदिर असून तेथेच शुक्रवारी पोळाही भरणार आहे. शिवाय बाजार समितीपुढेही कष्टणाऱ्या शेतकरी कुटुंबाची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.