राकाँ नेत्यांसमोर पेटविला कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:09 PM2017-12-03T22:09:17+5:302017-12-03T22:10:40+5:30
ऑनलाईन लोकमत
कळंब : कपाशीचे प्रत्येक बोंड अळीने फस्त केले. त्यामुळे कापूस खराब प्रतीचा निघतो. हा निकृष्ट दर्जाचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे गलमगाव येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच कापसाला आग लावून संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल दिंडीला रविवारी कळंब येथून सुुरुवात झाली. ही दिंडी गलमगाव येथे पोहोचली असता तेथील शेतकरी अतुल वागदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतातील बोंडअळी व निकृष्ट दर्जाचा कापूस दाखविला. कापसाला भाव नाही, बोंडअळीचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही, सोयाबीनला अत्यल्प भाव आहे, शेतात लावलेला पैसाही निघणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे, अशी व्यथा मांडत अतुलने कापसाला आग लावून सरकारचा निषेध केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.
मानकापूर येथे शेतकरी राहुल बोरकर यांनी कपाशीची वाताहत नेत्यांना दाखविली. बोंडअळीमुळे पूर्ण शेत फस्त केल्याची व्यथा मांडली. त्यानंतर सर्वांसमोर उभ्या कपाशीवर टॅक्ट्रर फिरवून संताप व्यक्त केला.