कापूस उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:49 PM2019-12-31T22:49:44+5:302019-12-31T22:55:33+5:30
यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्ग प्रकोपाने शेतशिवाराची हालत अतिशय खराब झाली. कृषी उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जात आहे. निसर्ग प्रकोपाचा सर्वाधिक फटका परंपरागत पिकांना बसला आहे. कापसाचे उत्पादन दहा लाख क्विंटले घटले आहे. तर सोयाबीनच्या उत्पादनातही पाच लाख क्विंटलची घट नोंदविण्यात आली आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.
ऋतुचक्र प्रभावीत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली आहे. कीडींचे आक्रमण, अपुरा पाऊस आणि पावसाचा खंड यातून कोरडवाहू क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. एक ते दोन वेच्यातच कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची उलंगवाडी झाली आहे. सध्या बाजारात केवळ ५ लाख १९ हजार क्विंटल कापूस विक्रीला आला आहे. गतवर्षी या सुमारास १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी झाली आहे. संपूर्ण हंगामात ही खरेदी १८ लाख क्विंटलच्या घरात नोंदविण्यात आली आहे. त्या तुलनेत २०१९ मध्ये १० लाख क्विंटल कापसाची घट नोंदविण्यात आली.
सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद या पिकांची अवस्था अशीच आहे. २०१८ मध्ये ९ लाख ७४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. आठ हजार ३८६ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. ८ हजार १४१ क्विटल उडीद आणि दोन हजार ५०० क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे. २०१९ मध्ये हे उत्पादन ३० टक्क्याने घटले आहे. यामुळे बाजार समित्यामधील आवक मंदावली आहे.
निसर्ग प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यानंतरही कृषी उत्पादनाच्या दरात कुठलीही दरवाढ नोंदविली गेली नाही. याला कांदा अपवाद राहिला आहे. कापसाचे दर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हजार रूपयाने कमी आहेत. तर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. खर्चाच्या तुलनेत ही दरवाढ नाममात्र आहे. यामुळे कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत.
शेतीच्या पुनरुज्जीवनाची गरज
शेती व्यवसायाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच खत, बियाणे, औषधांवर अनुदान देण्याची आवश्यकता आहे. खर्चावर आधारीत दर शेतमालास मिळण्याची गरज आहे. तरच शेतीचे पुनरुज्जीवन शक्य होणार आहे.