बोंडअळीने देशातील कॉटन इंडस्ट्रीज अडचणीत; कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:14 AM2017-12-04T10:14:19+5:302017-12-04T10:14:57+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे.

Cotton production decreased by half in Vidarbha | बोंडअळीने देशातील कॉटन इंडस्ट्रीज अडचणीत; कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले

बोंडअळीने देशातील कॉटन इंडस्ट्रीज अडचणीत; कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

राजेश निस्ताने ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कापसाला मिळणारा अत्यल्प हमीभाव दरवर्षी गाजतो. पण ही लूटही कमी वाटावी इतका गंभीर हल्ला यंदा बोंडअळीने केला आहे. हिरव्यागार बोंडाकडे पाहून शेतकरी खूश होते. पण बोंड फोडून पाहिले तर, प्रत्येक बोंडात अळी. आता फवारणी करूनही कापूस पिकविण्याची संधी नाही. उभ्या झाडांचे मरण पाहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हाती उरले आहे. त्याचा मोठा फटका कॉटन इंडस्ट्रीजलाही सहन करावा लागत आहे. बोंडअळी रोखण्यासाठी केलेल्या फवारणीने विदर्भातील ५० पेक्षा अधिक शेतकरी-शेतमजूर मरण पावले, ते वेगळेच.
बोंडअळीच्या हल्ल्याची व्याप्ती विदर्भ, मराठवाडा व तेलंगणापर्यंत आहे. देशातील सर्वाधिक टेक्सटाईल इंडस्ट्रीज दक्षिणेत आहेत. त्या इंडस्ट्रीजला नेहमीच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे. त्याचा फटका खासगी जिनिंग-प्रेसिंग व्यावसायिकांनाही बसतो आहे. विदर्भात ४०० पेक्षा अधिक खासगी जिनिंग-प्रेसिंग असून त्यातील शंभरहून अधिक जिनिंग बंद आहेत.
सध्या शेतकऱ्यांच्या हाती जो कापूस येतोय त्याची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. कवडी, किडक, बारक बोंड याचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणारा कापूस दर्जेदार नाही, कीडयुक्त कापसापासून तयार झालेल्या रूईगाठी निर्यात योग्य नाहीत. हा माल विक्री करताना जिनिंग व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे भविष्यात कापसाला भाव वाढण्याची चिन्हे नाहीत. सद्यस्थितीत चांगल्या कापसाला अधिकाधिक ४६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे.

बोगस बीटीमुळे चांगले बियाणे वांध्यात
राज्यात काही भागात स्वस्तात मिळणाऱ्या बोगस बिटीचा पेरा झाला. या बोगस बीटीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. नंतर याच अळ्यांनी नामांकित बिटी बियाण्यांवरही हल्ला चढविला. ही बोंडअळी जमिनीत रुजली असून पुढच्या वर्षीसुद्धा कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी फरदड कापूस निघत असल्याने फेब्रुवारी-मार्चपर्यंत शेतकरी प्रतीक्षा करतात. परंतु यावर्षी डिसेंबर अखेरच शेताची उलंगवाडी (हंगाम संपणे) करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अर्थात शेतकऱ्यांचा कापसाचा सिझन यंदा डिसेंबरमध्येच संपणार आहे.


बोंडअळीने कापसाची गुणवत्ताच संपविली. त्यामुळे अशा कापसापासून तयार होणाऱ्या रूईगाठींना दक्षिणेत मागणीच नाही. टेक्सटाईल इंडस्ट्रीजकडून मालाला उठावच नसल्याने विदर्भातील खासगी कॉटन उद्योग संकटात सापडले आहेत. बोंडअळीचा कृषी खात्याने आत्ताच बंदोबस्त करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढच्या वर्षी खरीप हंगामात पुन्हा बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नौशाद काराणी, संचालक, खासगी जिनिंग-प्रेसिंग, यवतमाळ.

बोंडअळीच्या आक्रमणामुळे कापसाचे सरासरी उत्पन्न आणि गुणवत्ताही घटली आहे. पुढील वर्षी या अळीचे आक्रमण होऊ नये म्हणून यंदा शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे.
- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

Web Title: Cotton production decreased by half in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती