आजपासून वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:01 PM2024-11-13T18:01:10+5:302024-11-13T18:02:50+5:30
कापूस उत्पादकांना दिलासा : दीड हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १३ नोव्हेंबरपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार आहे, तर १८ नोव्हेंबरपासून शिंदोला उपबाजार समितीच्या आवारात कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे. नोव्हेंबरपासून सीसीआयच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून, आतापर्यंत एक हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.
देशभरात यंदा सीसीआयच्या माध्यमातून ५०० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत राज्यात १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, यातील ६१ केंद्रे विदर्भातील आहेत. ८ ते १२ टक्के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा दर्जाच्या कापसासाठी सात हजार ५२१ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन सहा हजार ६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल (अधिक लांबीचा धागा) साठी आठ ७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे. विदर्भात पश्चिम विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा आहे. दिवाळीनंतर कापसाचा हंगाम प्रारंभ झाला. मागील चार-पाच दिवसांपासून कापूस बाजारात येत आहे. सीसीआयचा कापूस जिनिंग प्रेसिंगसाठी वणीतील १२ जिनिंगधारकांच्या निविदा पास झाल्या आहेत.
नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात चालू आर्थिक वर्षाचा ऑनलाइन सातबारा उतारा व कापूस पिकपेरा तसेच बँकेला व आधार कार्डला लिंक असलेला मोबाइल क्रमांकासह आधार कार्डची सत्यप्रत घेऊन प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करून घ्यावी. सीसीआयमार्फत पिकपेयाप्रमाणे एकरी १२ क्विंटलप्रमाणे खरेदी ग्राह्य धरण्यात येणार आहे. एका दिवसात जास्तीत जास्त ४० क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे. पिवळा पडलेला. पावसात (पाण्यात) भिजलेला कापूस खरेदी केला जाणार नाही.
"शेतीमाल विक्री करताना बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करावा व खरेदीदाराकडून अधिकृत हिशेबपट्टी घ्यावी. जेणेकरून भविष्यात शासनाकडून शेतीमालासाठी अनुदान जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे सुलभ होईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीचा परवाना न घेता काही व्यापारी अनधिकृतपणे शेतीमालाची खरेदी करीत असून, असे व्यापारी निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणे सुलभ जाईल."
- अशोक झाडे, सचिव, बाजार समिती, वणी