यवतमाळात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 07:05 PM2022-05-11T19:05:07+5:302022-05-11T19:05:41+5:30

Yawatmal News बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला यवतमाळ गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Counterfeit notes gang arrested in Yavatmal | यवतमाळात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

यवतमाळात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्दे२१ हजारांच्या नोटा जप्त

यवतमाळ : शहरातून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवली. त्यानंतर पांढरकवडा रोडवरील रचना कॉलनी येथील या टोळीतील चौघांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून २१ हजार ६०० रुपये किमतीच्या २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

सय्यद वसीम सय्यद जमील (२३) रा. बिलालनगर कोहिनूर सोसायटी, वसीम शहा ऊर्फ मुन्ना अहेमद शहा (२७) रा. पाटील ले-आऊट कोहिनूर सोसायटी, दानिश शहा तय्यब शहा (१९) पिग्मी एजंट रा. सुंदरनगर भोसा, साकीब हमीद अकबानी (२१) रा. मेमन कॉलनी यवतमाळ यांना अटक करण्यात आली. या टोळीमध्ये जुने वाहन खरेदी-विक्री करणारा, भाजीपाला विक्री करणारा, पतसंस्थेची वसुली करणारा पिग्मी एजंट, रोजमजुरी करणारा अशा सर्वच घटकांचा समावेश आहे. हे आरोपी शिताफीने बनावट नोटा चलनात वापरत होते.

पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवल्यानंतर मंगळवारी रात्री रचना सोसायटी पांढरकवडा रोड येथे जावून कारवाई केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल, दोन मोटारसायकली यांसह २०० रुपयांच्या १०८ बनावट नोटा जप्त केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख यांनी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. विवेक देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ४८९ (ब) (क), १२० (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे. आरोपींनी या नोटा आणल्या कोठून याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

Web Title: Counterfeit notes gang arrested in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.