देश सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर
By admin | Published: April 10, 2016 02:50 AM2016-04-10T02:50:01+5:302016-04-10T02:50:01+5:30
सध्या घडत असलेल्या घटना पाहता हा देश कधी नव्हे एवढा ज्वालामुखीच्या तोंडावर ठेवलेला आहे.
संजय मून : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वात ‘आंबेडकरी युवक’ विषयावर व्याख्यान
पुसद : सध्या घडत असलेल्या घटना पाहता हा देश कधी नव्हे एवढा ज्वालामुखीच्या तोंडावर ठेवलेला आहे. मागील तीन-चार महिन्यात घडलेल्या घटनांचा संबंध आंबेडकरी चळवळीशी नाही असा अर्थ नाही. हैदराबाद आणि दिल्ली विद्यापीठातील घडामोडी आंबेडकरी चळवळीशी संबंधित आहे, असे विचार औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे उपसंचालक डॉ. संजय मून यांनी व्यक्त केले.
पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्व या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आंबेडकरी युवक आणि सद्यस्थितीतील आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले होते. सुरुवातीला प्रवीण राजहंस आणि संचाने भीमगीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. पंचशील महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदना सादर केली. यावेळी खुशी भगत या चिमुकलीने भाषण दिले.
डॉ. मून पुढे म्हणाले, बरेचदा दंगलीमध्ये खाकी कपडे घालून बेरहमीने मारहाण होते. काळा कोट खाकी कपडे घातलेले लोक कोण असतात, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. दिल्ली आणि हैदराबाद विद्यापीठातील घटना एकच आहे. खैरलांजी प्रकरणात ही मंडळी नक्षलवादी आहे म्हणून आरोप झाला होता. सरकारमध्ये कोणतीही माणसे आली तरी आंबेडकरी चळवळ राष्ट्रविघातक चळवळ म्हणून जाहीर होण्याची भीती आहे, असे डॉ. मून म्हणाले.
उपविभागीय अधिकारी हिंगोले म्हणाले, तरुणांना शिक्षणाचा मुद्दा रास्त वाटतो. आंबेडकरांचे अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचले तर त्यांच्या विचारांचा आवाका ध्यानात येईल. ‘प्रॉब्लेम आॅफ रूपी’ हा त्यांचा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे. या देशाला आजही आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले. आभार प्रा. विलास भवरे यांनी मानले. (प्रतिनिधी)