देशाचे अखंडत्व भूषणावह
By admin | Published: January 28, 2017 02:24 AM2017-01-28T02:24:08+5:302017-01-28T02:24:08+5:30
विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे.
पालकमंत्री : प्रजासत्ताक दिन मुख्य ध्वजारोहण सोहळा
यवतमाळ : विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या लोकशाहीने देशबांधवात विश्वास आणि आत्मियता निर्माण केली. यामुळेच देशाचे अखंडत्व प्रत्येक भारतीयासाठी भूषणावह आहे. आज जगात सर्वात मोठी आणि निकोप लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
येथील पोस्टल मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यानिमित्ताने ना. येरावार यांनी जनतेस संदेश दिला. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री ना. येरावार म्हणाले, राज्यघटनेच्या स्वीकारामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही, असे बिरूद भारताला मिळाले आहे. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने लोकशाही प्रस्थापित होऊन संपूर्ण जगातील एक प्रगल्भ लोकशाही म्हणून भारताचे नाव घेतले जाते. देशात लोकशाही असल्यामुळे राज्याने सर्वच क्षेत्रात विकास केला आहे. संपूर्ण देशात प्रगती साधणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा प्रामुख्याने उल्लेख होतो. देशाच्या आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये राज्य केंद्रस्थानी आहे. यापुढेही राज्य अग्रक्रम कायम राखेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर विविध पथकांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस, वन, होमगार्ड, स्काऊट गाईड आदींच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. जलदगती प्रतिसाद पथकाने दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक केले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. चंद्रबोधी घायवाटे आणि ललिता जतकर यांनी संचालन केले. (वार्ताहर)