‘सीपीएस’चे प्रवेश ‘मेडिकल’ने नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:53 PM2018-07-04T21:53:49+5:302018-07-04T21:56:24+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीपीएस’ बोर्डाने पाठविलेल्या पाच विद्यार्थ्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारला.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ‘सीपीएस’ बोर्डाने पाठविलेल्या पाच विद्यार्थ्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. बोर्डाने कोणतीही पूर्व सूचना न देता या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाठविल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र या सर्व प्रकारात प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सीपीएस बोर्ड (कॉलेज आॅफ फिजीशियन अॅन्ड मेडिसीन) यांच्याकडून प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार निवडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. यंदा या प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार वैद्यकीय महाविद्यालयात एफसीपीएच व डीजीओ प्रवेश घेण्याचे निर्देश दिले. मात्र सीपीएच बोर्डांने यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयाशी संपर्क न करता पाच विद्यार्थ्यांना थेट प्रवेशासाठी पाठविले. या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. पाच विद्यार्थ्यांपैकी एक मेडिसीन आणि उर्वरित चार स्त्रीरोग विभागासाठी आले होते. या दोन्ही विभागात एमसीआयच्या मान्यतेनुसार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. आता सीपीएस बोर्डाच्या निर्देशाने प्रवेश दिल्यास पदव्युत्तर अभ्याक्रम मान्यतेला धक्का बसू शकतो. हीच सबब पुढे ठेवत प्रवेश नाकारला आहे. २०१७ मध्येच वैद्यकीय महाविद्यालयाने सीपीएस बोर्डाला येथे प्रवेश देता येणे शक्य नसल्याचे कळविले. त्याउपरही २०१८ च्या सत्रात पाच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पाठविण्यात आले.
यवतमाळ मेडिकलमध्ये बहुतांश विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला एमसीआयकडून मान्यता मिळाली आहे. अशा स्थितीत पुन्हा सीपीएसच्या जागा नियमानुसार सुरू ठेवता येत नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. प्रतिक्रियेसाठी सीपीएस बोर्डाचे अध्यक्ष डॉ. गिरीष मैदनकर यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मल्टीस्पेशालिटीच्या संचालकाची लुडबूड
सीपीएस बोर्डाच्या अनागोंदीमुळे संकटात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी कायदेशीर पवित्रा घेऊ नये म्हणून यवतमाळातीलच एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या एका संचालकाने मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कोणतेही अधिकार नसताना ही व्यक्ती केवळ सीपीएस बोर्डाच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी पुढे आल्याने एकंदर बोर्डाच्या कार्यप्रणालीबाबत संशय निर्माण झाला आहे. यापूर्वी सीपीएस प्रवेशात महाविद्यालयास्तरावर मोठा घोडेबाजार होत होता. त्याच कारणाने हा प्रवेश स्वतंत्र बोर्डांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेद्वारे केला जात आहे. त्यातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली.