फटाक्याने दोन एसटी बसची राखरांगोळी

By admin | Published: November 13, 2015 02:14 AM2015-11-13T02:14:45+5:302015-11-13T02:14:45+5:30

दिवाळीचा दिवस... वेळ रात्री ११.३० वाजताची... सर्वत्र फटाक्याची आतषबाजी... ‘एसटी’ बस आगारातून अचानक आगीचे गोळे उठलेले...

The cracker of the two ST buses is a rocket | फटाक्याने दोन एसटी बसची राखरांगोळी

फटाक्याने दोन एसटी बसची राखरांगोळी

Next

यवतमाळ आगार : मध्यरात्रीची घटना, ‘हिरकणी’ व ‘परिवर्तन’ जळल्याने ५० लाखांचे नुकसान
यवतमाळ : दिवाळीचा दिवस... वेळ रात्री ११.३० वाजताची... सर्वत्र फटाक्याची आतषबाजी... ‘एसटी’ बस आगारातून अचानक आगीचे गोळे उठलेले... अग्निशमन दलाची वाहने भरधाव निघालेली... फटाक्यांच्या आवाज काही वेळ थांबलेला... पाहता-पाहता दोन बसचा कोळसा झालेला... पत्र्याचे अक्षरश: पाणी झालेले... हा थरार आहे, यवतमाळ एसटी आगारातील. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फटाका पडल्याने दोन बसेस पेटल्या.
एमएच ०६-एस ८३४९ या क्रमांकाची ‘हिरकणी’ आणि एमएच ४०-एन ८५१४ या क्रमांकाची ‘परिवर्तन’ बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या दोनही बसचा कोळसा झाल्याने एसटी महामंडळाचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ‘हिरकणी’च्या अ‍ॅल्यूमिनियम पत्र्याचे अक्षरश: पाणी झाले. या बसचा टायरपासून ते टपापर्यंतचा एकही पार्ट उपयोगात येण्यासारखा राहिलेला नाही. या बसला लागूनच उभ्या असलेली परिवर्तन बसही जवळपास निकामी झाली आहे. अग्निशमन दल तत्काळ दाखल झाल्याने थोडीफार हाती लागली.
यवतमाळ आगारात बुधवारी रात्री ७६ बसेस उभ्या होत्या. तीन मेकॅनिकल आणि एक चालक या ठिकाणी कार्यरत होते. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली ‘हिरकणी’ बस आगार प्रमुखाच्या निवासस्थानाला लागूनच असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभी होती. फटाका पडल्याने कचऱ्याने पेट घेतला. पाहता-पाहता उभी बस पेटत्या कचऱ्याने आपल्या कवेत घेतला. हा प्रकार लक्षात येताच कार्यरत एसटी कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. मदत पोहोचेपर्यंत ‘हिरकणी’चा कोळसा झाला होता, तर या बसला लागून असलेल्या ‘परिवर्तन’ बसपर्यंत आग पोहोचली. तोपर्यंत उपस्थित असलेल्या चालकाने इतर बसेस सुरक्षित स्थळी हलविल्या होत्या.
सदर घटनेची माहिती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह घटनास्थळी दाखल झाले होते. ‘एसटी’चे विभागीय वाहतूक अधिकारी मुक्तेश्वर दाणी, आगार व्यवस्थापक दीपक इंगळे यांनीही हजेरी लावली. यवतमाळ आगारात आगार व्यवस्थापकांसाठी निवासस्थान आहे. त्याचा वापर मात्र होत नाही. सदर घटना आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान असलेल्या अगदी प्रवेशद्वारासमोरील आहे. हे ठिकाणी कचराकुंड बनले आहे. आॅईलने भरलेले कापड, कचरा या ठिकाणी टाकला जातो. हीच बाब दोन बसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यास कारणीभूत ठरली. आॅईलने भरलेल्या कापडामुळेच आग भडकून बसपर्यंत पोहोचल्याच्या निष्कर्षाप्रत एसटी कामगार पोहोचले आहे. दरम्यान, सदर घटनेची तक्रार आगार प्रमुखांनी पोलिसात दिली आहे. (वार्ताहर)

आग विझविताना डिझेल टँक पहिले ‘लक्ष्य’

आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या दोनही बसच्या डिझेल टँक वाचविण्याचा सर्वात पहिला प्रयत्न करण्यात आला. या टँक फुटल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. आगाराच्या बाहेरील भागाला असलेली दुकाने आणि आगारातील इतर बसेस, साहित्याला धोका झाला असता. त्यामुळे यासाठी प्रसंगावधान राखण्यात आले.

दक्षता बाळगण्यात हलगर्जीपणा
दिवाळीनिमित्त होणारी फटाक्यांची आतषबाजी लक्षात घेता ‘एसटी’च्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना पत्र देऊन दक्षता बाळगण्याच्या सूचना सात दिवसांपूर्वी केल्या होत्या. आगारात ज्वलनशील पदार्थ असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडून महामंडळाच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने उपाय करावे, असे यात सूचविले होते. डिझेल पंपाच्या बाजूला आणि आॅईल रुमच्या बाजूला पाण्याने भरलेल्या बॅरल ठेवाव्या, डिझेल पंपाच्या बाजूला बाळून व पाण्याने भरलेल्या बकेट ठेवाव्या, वाळलेल्या झाडा-झुडपांची विल्हेवाट त्वरित लावावी, सुरक्षा रक्षकांमार्फत अग्निशमन उपकरणांची तपासणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या असे सूचविले होते. मात्र या बाबी आगार व्यवस्थापकांनी पूर्णत: टाळल्याचे याप्रसंगी दिसून आले.

Web Title: The cracker of the two ST buses is a rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.