परसबागेत फुलझाडे, सेंद्रीय भाजीपाल्याची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:46 PM2018-03-26T21:46:17+5:302018-03-26T21:46:17+5:30
येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.
मुकेश इंगोले ।
आॅनलाईन लोकमत
दारव्हा : येथील गजानन महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या वानखडे दाम्पत्याने घराचे अंगण, आजूबाजूची जागा एवढेच नव्हेतर छतावर परसबाग तयार करून त्यामध्ये सेंद्रीय पद्धतीने विविध फुलझाडे व भाजीपाल्याची निर्मिती केली.
छोटासा गांडूळ खत प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे ओल्या, सुक्या कचऱ्याची विल्हेवाट घरातच लावल्या जाते. डासांचा त्रास नाही. सर्वत्र हिरवळ असल्याने वातावरण प्रसन्न राहते. शिवाय घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला तयार होतो, असे सर्व फायदे असल्यामुळे या कुटुंबाचा हा उपक्रम प्रेरणा देणारा ठरला आहे. येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे प्रा.अतुल वानखडे यांना सुरुवातीपासूनच या कार्याची आवड आहे. त्यात त्यांना एमएस्सी कृषी शिक्षण घेतलेल्या पत्नी भावनातार्इंची साथ मिळाली आणि या दोघांचा उत्साह व मेहनीतून सुंदर अशी परसबाग तयार झाली. घराच्या अंगणात जागा करून तसेच कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी, विदेशी शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली. त्यामध्ये शेवंती, कोलीअस, अॅन्शेरियम, गॅलेरडीया, जरनेरा, अॅडोनियम, मोगरा, ग्लॅडिओली, डेहेलिया, सकुलंट, हँगीग प्लँन्टस, अॅरिला क्रोटान यासह इतर शोभेच्या व फुलांच्या झाडांचा समावेश आहे. त्यांनी घराच्या छतावर शेड तयार करून भाजीपाल्याची लागवड केली. काही जागेवर वाफे केले. टाकावू वस्तूंचा वापर करून भाज्यांची लागवड केली. वांगी, टोमॅटो, मिरची, कांदा, मेथी, पालक, भेंडी, सांभार, शेपू, फुलकोबी, वालाच्या शेंगा, लवकी, काकडी, कारले तर रताळ, गाजाराचे उत्पन्न घेतल्या जाते. यावर रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. शंभर टक्के सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकविला जातो. त्यासाठी गांडूळ खत तयार केले जाते. यामुळे फुलझाडे व भाजीपाल्याकरिता खत मिळते. घरातील कचरा, झाडांची पाने यांची विल्हेवाट लागते तर सुका कचरा जाळला जातो. त्यामुळे या घरातून कचºयाचा कणसुद्धा बाहेर जात नाही. सर्वत्र स्वच्छता असल्याने डास तयार होत नाही. अंगण व छतावरील झाडांमुळे वातावरण थंड राहते. प्रसन्न वाटते. विशेष म्हणजे छतावरील शेड सोडले तर कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे.
पालिकेला प्रेरणादायी
नगरपरिषदेच्या शहर स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी बजावू शकेल असा हा वानखडे दाम्पत्याचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रशासन व नागरिकांनी यातून प्रेरणा घेऊन शहराच्या सौंदर्यात भर घातली पाहिजे.