किन्हाळा येथे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार, सहा महिन्यातील दुसरी घटना
By विलास गावंडे | Published: August 19, 2022 08:00 PM2022-08-19T20:00:23+5:302022-08-19T20:00:49+5:30
किन्हाळा गावात स्मशानभूमी नाही. नदीला लागून असलेल्या एका शेतात अंत्यसंस्कार केले जात होते...
यवतमाळ- स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी किन्हाळा ता. कळंब येथे घडला. बसस्थानकाजवळच अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. मात्र पोलीस आल्याने नदी जवळ असलेल्या शेतालगतच्या रस्त्यावर हा विधी पार पाडण्यात आला. या गावातील सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान स्मशानभूमीच्या जागेसाठी सोमवारी कळंब येथे अधिकारी आणि किन्हाळा गावातील नागरिकांची बैठक होणार आहे.
किन्हाळा गावात स्मशानभूमी नाही. नदीला लागून असलेल्या एका शेतात अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र यावर्षी संबंधित शेतकऱ्याने या जागेवर पेरणी केली. त्यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. ज्या लोकांकडे शेती आहे ते स्वत:च्या शेतात हा विधी पार पाडत होते. मात्र काही लोकांपुढे प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी किन्हाळा गावातील दुलसिंग जग्गू राठोड (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. याविषयी गावकऱ्यांनी मेटीखेडा येथील नायब तहसीलदार कार्यालयाला कळविले. मात्र पर्याय सांगितला गेला नाही.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता दुलसिंग राठोड यांच्या पार्थिवावर बसस्थानकाजवळच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्व साहित्य या ठिकाणी आणून टाकण्यात आले. ही बाब वडगाव जंगल पोलिसांना माहीत झाली. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पोहोचली. दुपारी १२ वाजतापर्यंत चर्चेचा विषय सुरू राहिला. अखेर मार्कंडा मार्गावर या आधी जेथे अंत्यसंस्कार होत होते, त्याच शेतालगत रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.