गांजाचे आंतरपीक घेणाऱ्या पाच शेतकऱ्यांवर गुन्हा
By विशाल सोनटक्के | Published: October 6, 2023 07:23 PM2023-10-06T19:23:33+5:302023-10-06T19:24:26+5:30
महागाव तालुक्यात कारवाई : २५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त
यवतमाळ : महागाव तालुक्यातील घोणसरा व काळीदौलत शिवारात मागील दोन दिवसांपासून अवैध गांजा शेतीवर पोलिस कारवाई सुरू होती. अखेर या प्रकरणी पाच शेतकऱ्यांवर पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून या शेतकऱ्यांकडून सुमारे २५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाईचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे.
फालसिंग बाबूराव राठोड तसेच परिसरातील इतर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाची अवैध लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या पथकातील पोलिसांनी प्रारंभी साध्या वेशात जाऊन माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक पोलिसांनी बुधवारी या शेतात धाड टाकली. येथे फालसिंग राठोड याच्या गोठ्यातून एका कापडी पिशवीमध्ये गांजा वनस्पतीची एक किलो २५ ग्रॅम बिजे आढळून आली. तसेच गोठ्यामागील शेत परिसरात कापूस व तूर पिकांची लागवड केलेल्या क्षेत्रात काही अंतरावर गांजा लावल्याचे आढळले.
या झाडांची मोजणी केली असता ६१० झाडे गांजाची आढळली. तसेच परिसरातील घोणसरा येथील देविदास श्यामराव ढाकरे, सुखदेव श्यामराव ढाकरे, वनदेव श्यामराव ढाकरे यांच्या शेतातही कापूस व तूर पिकामध्ये गांजाची एकूण ९६० झाडे आढळली. तर हिरासिंग राठोड यांच्या शेतात ९४० गांजा झाडे होती. वरील पाचही आरोपींकडून २५१० झाडांमधून २५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ५०७ किलो (पाने व शेंडे) वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे २१ हजार २५० रुपये किमतीचे १.२५ किलो ग्रॅम गांजा बिजही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच पुसद पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.