शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर गुन्हा
By admin | Published: July 12, 2014 01:49 AM2014-07-12T01:49:02+5:302014-07-12T01:49:02+5:30
शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उमरखेड(कुपटी) : शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील खरूस येथील शेतकऱ्यांकडून दहा लाख ३५ हजार रुपयांचे धान्य खरेदी करण्यात आले होते. या प्रकाराने व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली.
सागर सुभाष बदलवा, सुभाष गोपीलाल बदलवा, सत्यनारायण बालाप्रसाद दरक, आशिष सत्यनारायण दरक रा. आष्टी, ता. हदगाव, जि. नांदेड, रमेश रघुनाथ वानखडे, बालाजी राघोजी सूर्यवंशी रा. खरूस असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमरखेड तालुक्यातील खरूस बु. येथील शेतकरी मारोतराव वानखेडे, प्रकाश वानखडे, उत्तमराव पाटील यांनी हरभरा व्यापारी सागर बदलवा यांना दिला. सदर व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक आहे. गावातच खरेदी केल्यानंतर काटा पावती आणि मालाच्या किमतीचीही पावती दिली. परंतु रोख पैसे दिले नाही. चार दिवसानंतर पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. एक महिना झाला तरी पैसे मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी १२ जून रोजी उमरखेड पोलीस ठाणे आणि उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीचे कृषी निरीक्षक आ.द. जगताप यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. चौकशीअंती ५ जुलैला अहवाल दिला. या अहवालात सागर बदलवा हे बाजार समितीचे परवानाधारक खरीददार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ९६० क्विंटल सोयाबीन व १४० क्विंटल हरभरा खरेदी केल्याचे पुढे आले. मारोतराव वानखडे यांचे ७ लाख ८२ हजार, उत्तमराव पाटील यांचे ५७ हजार २२४, प्रकाश वानखडे यांचे ४९ हजार २०२ रुपये, प्रकाश आबाजी वानखडे यांचे १ लाख ४६ हजार ४७० असा एकूण १० लाख ३५ हजार ८१८ रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले.
याप्रकरणी बाजार समितीचे सचिव अशोक कनवाळे यांच्या तक्रारीवरून सहा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)