नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:16 PM2024-04-23T21:16:16+5:302024-04-23T21:16:35+5:30
तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत फोडला मोबाईल.
विशाल सोनटक्के / उमरखेड (यवतमाळ ) : नांदेड, उमरखेड मार्गावर मार्लेगाव येथील निवडणूक विभागाच्या वतीने उभारलेल्या तपासणी नाक्यावर वाहन थांबविले असता कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याचा मोबाईल फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे स्वत:कडील एमएच-२६-बीएक्स-२९२९ या वाहनाने हदगाववरून उमरखेडकडे येत होते. रस्त्यात मार्लेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. येथे शासकीय कर्मचारी मारोतराव काकडे, प्रकाश पवार, अशोक सूर्य, राजरतन नवसागरे, तसेच पोलिस शिपाई संघर्षशील टेंभरे व गजानन आडे हे नाकाबंदीच्या कर्तव्यावर आहेत. यातीलच कर्मचाऱ्यांनी आष्टीकर यांना त्यांचे वाहन तपासणीसाठी थांबविण्यास सांगितले. या वेळी संतापलेल्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलिस कर्मचारी संघर्षशील टेंभरे यांच्याकडील मोबाईल हिसकावून फोडला तसेच सहकारी कर्मचारी रामकिसन शिंदे यांच्या गळ्यातील ओळखपत्र हिसकावले. त्यानंतर तेथून ते पसार झाले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रामकिसन शिंदे (४९) रा. गोकुळनगर उमरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.