२८ लाखांच्या कापूस धाग्यासह ट्रक बेपत्ता, चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 04:16 PM2022-01-30T16:16:28+5:302022-01-30T16:19:04+5:30
संबंधित ट्रक हा नागपूर येथील अभय बन्शीधर वर्मा या वाहतूक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा आहे. वर्मा यांच्यासोबत ७ जानेवारीपर्यंत गुलफान फोनद्वारे संपर्कात होता. मात्र, ७ जानेवारीनंतर गुलफान बेपत्ता आहे.
यवतमाळ : कापूस धागा घेऊन अहमदाबादला निघालेला ट्रकचालक ३५ लाखांच्या मुद्देमालासह गायब झाला. या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुलफान वल्द मेहंदी हसन (वय ३०, रा. उस्क, ता. कोहंडूर, जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार १ जानेवारीला गुलफानने येथील नागपूर बायपासजवळील गुरुलक्ष्मी कंपनीमधून २४५ बॅग कॉटनयार्न (धागा) भरला. हा माल ट्रक(एम.एच.४०/ए.के.२०६९)मधून तो गुजरातकडे घेऊन निघाला. हा माल अहमदाबाद येथील श्याम पॉलिस्पीन या कंपनीला पोहोचवायचा होता; परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही हा माल अहमदाबादपर्यंत पोहोचलाच नाही. २८ लाख ५६ हजार १८७ रुपयांचा कापूस धागा आणि सात लाख रुपयांचा ट्रक असा ३५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल घेऊन ट्रकचालक पसार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
संबंधित ट्रक हा नागपूर येथील अभय बन्शीधर वर्मा या वाहतूक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा आहे. वर्मा यांच्यासोबत ७ जानेवारीपर्यंत गुलफान फोनद्वारे संपर्कात होता. मात्र, ७ जानेवारीनंतर गुलफान बेपत्ता आहे. तो ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्याही संपर्कात नाही. अखेर २८ जानेवारीला अभय वर्मा यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुलफान वल्द मेहंदी हसन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पांढरकवडानजीक राष्ट्रीय महामार्गावर २५ लाखांच्या औषधींचा ट्रक लुटण्यात आला होता. तर, रुंझाननजीक ट्रकचालकाला झाडाला बांधून लुटले होते. त्यामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली आहे.
वर्षभरातील ट्रक चोरीची दुसरी घटना
यवतमाळमधील एका कंपनीचा कापड घेऊन निघालेला नागपूरच्याच ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक काही दिवसांपूर्वी असाच बेपत्ता करण्यात आला होता. वर्षभराचा कालावधी लोटण्यापूर्वीच आता नागपुरातील ट्रान्सपोर्ट कंपनीचाच आणखी एक ट्रक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत असले तरी यात गंभीर गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.