चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा
By सुरेंद्र राऊत | Published: October 5, 2022 05:28 PM2022-10-05T17:28:38+5:302022-10-05T17:29:56+5:30
यवतमाळ शहरात पोलिसांचा वचक संपला आहे, विसर्जन मिरवणुकीत पहिला वाद हा आठवडी बाजार परिसरात झाला.
यवतमाळ - जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधत असलेल्या पाच जणांनी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत युवकावर चाकूने हल्ला केला. ही घटना यवतमाळ शहरात मंगळवारी रात्री 9.30 वाजता घडली. यातील जखमी युवकाचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रवीण कवडुजी केराम वय 23 वर्ष रा. तलाव फैल असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी साहिल संजय रामटेके रा आंबेडकर नगर पाटीपुरा यवतमाळ, प्रफुल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल उर्फ पीजी याच्या विरोधात हरिष अरुण मुळे रा तलाव फैल याने तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेतील मृतक प्रवीण केराम हा कुख्यात गँगस्टर अक्षय राठोड याचा विश्वासू म्हणून ओळखला जात होता.
आरोपी साहिल व प्रफुल सोबत प्रवीणचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, त्याला संपवण्याची आरोपी संधी शोधत होते, मंगळवारी रात्री तो विसर्जन मिरवणुकीत हाती लागला. त्याला वाणीपुरा गल्लीत घेरून त्याच्यावर पाच जणांना हल्ला केला.
पोलिसांचा वचक संपला, चार ठिकाणी निघाली शस्त्र
यवतमाळ शहरात पोलिसांचा वचक संपला आहे, विसर्जन मिरवणुकीत पहिला वाद हा आठवडी बाजार परिसरात झाला. येथे गुन्हेगारी टोळीतील सदस्यांनी देवी मंडळ कार्यकर्त्या सोबत वाद घातला, हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही ते गुंड चालून गेले, मात्र प्रकरण जागेवरच शांत करण्यात आले, नेहरू चोक येथेही काहींनी मिरवणूकीत शस्त्र काढले होते, आर्णी मार्गावरही मंगळवारी रात्री 12 वाजता टोळक्याने धुमाकूळ घातला, या घटना पोलिसांनी रेकॉर्डवर घेतली नाही.