बनावट दस्तावेज तयार करून शासनाची फसवणूक; आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 03:16 PM2022-10-22T15:16:59+5:302022-10-22T15:19:46+5:30
झरी जामणी न्यायालय : शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण
वणी (यवतमाळ) : आपसी संगनमत करून खोटे व बनावट दस्तावेज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी झरी जामणी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून आठ जणांविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रदीप नंद (५५, रा. अकोला), सुनील मिश्रा (५२, रा. नागपूर), राजेंद्रगिर गोसावी (५५, रा. यवतमाळ), तक्षशिला गजभिये (३५, रा. यवतमाळ), संजय इंगळे (४२, रा. यवतमाळ), ओ. एस. भौंड (३८, रा. यवतमाळ), अंजली नगरकर (४५, रा. नागपूर), जिग्नेश गोपाणी (३२, रा. मुंबई) अशी संशयीत आराेपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७०, ४७४ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. घाटंजी तालुका रोहयो समितीचे माजी अध्यक्ष अयनुद्दीन सोळंकी यांच्यामार्फत ॲड. रंजित अगमे, ॲड. आर. एम. बोथले यांनी झरी जामणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
झरी तालुक्यातील अडेगाव येथील भोगवटदार वर्ग २ वन विभागाच्या मालकीची शेतजमीन प्रदीप नंद यांच्या नावाने असून गोसावी, गजभिये व इंगळे यानी संगनमत करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केली. नंद यांच्या नावाने बेकायदेशीर खनिकर्म पट्टा लिहून दिला. यासाठी ६ सप्टेंबर २०२८ रोजी चुकीचा दुरुस्ती लेख जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून लिहून देण्यात आला.
गोसावी, गजभिये व इंगळे यांनी गैरकायदेशीरपणे लीज करारनामा नंद यांना लिहून दिला. त्याकरिता नंद व इतरांनी शासनाची दिशाभूल व फसवणूक करुन शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान केले. याप्रकरणी सोळंकी यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तरीही गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी झरी जामणी दिवाणी न्यायाधीश बी. एस. वाढई यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार आठ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. मुकुटबनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान पुढील तपास करीत आहे.