जिल्हा बॅंकेतील ८९ लाखांचा अपहार, 4 निलंबितांवर अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 01:36 PM2021-03-18T13:36:13+5:302021-03-18T13:38:30+5:30

जिल्हा बॅंकेतील अपहार ८९ लाखांचा : ऑडिटमध्ये आकडा आणखी वाढणार

Criminal charges finally filed against four suspended in Arni | जिल्हा बॅंकेतील ८९ लाखांचा अपहार, 4 निलंबितांवर अखेर गुन्हा दाखल

जिल्हा बॅंकेतील ८९ लाखांचा अपहार, 4 निलंबितांवर अखेर गुन्हा दाखल

Next

आर्णी (यवतमाळ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील ८९ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अखेर बुधवारी रात्री उशिरा चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आता या आरोपींच्या शोधात आहेत. आर्णी शाखेतील हा गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन निलंबन व एफआयआर करण्यात आला. आर्णी शाखेचे व्यवस्थापक रणजित मधुकर गिरी यांनी आर्णी पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदविली. २०१८ पासून १२ मार्च २०२१ पर्यंत प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांची अफरातफर झाल्याचे नमूद करण्यात आले.

त्यावरून भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. त्यात आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता सुनील पुसनायके (४५) रा. यवतमाळ, लेखापाल अमोल पांडुरंग मुजमुले (४३) रा. जवळा ता. आर्णी, रोखपाल विजय खुशालराव गवई (५२) रा. यवतमाळ व अंकित दीपक मिरासे (३५) रा. सुकळी ता. आर्णी यांना आरोपी बनविण्यात आले आहे. विशेष असे गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संचालक मंडळाने तिघांना तडकाफडकी निलंबित केले होते. तर कंत्राटी असलेल्या अंकितची सेवा समाप्त केली होती. या आरोपींनी संगनमताने २५ ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम काढणे, त्यासाठी विड्रॉल स्लीप, चेक स्लीप याच्यावर खाडाखोड करणे, खोटे दस्तावेज तयार करणे, ते खरे म्हणून वापरणे, ग्राहकांच्या बचत खाते पुस्तकावर स्व:हस्ते एन्ट्री करून खोटे हिशेब तयार करणे, बॅंकेची फसवणूक करून न्यायभंग करणे, बॅंकेच्या खातेधारकांना ठगविणे आदी ठपका पोलिसातील तक्रारीत ठेवण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार अलकनंदा काळे यांनी ही फिर्याद नोंदवून घेतली असून आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

ऑडिटच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा
आर्णी शाखेतील फिर्याद ही तूर्त ८९ लाखांची देण्यात आली असली तरी लेखापरीक्षणाच्या अंतिम अहवालात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आपली रक्कम बॅंक खात्यात सुरक्षित आहे की नाही हे तपासणीसाठी तीन दिवसांपासून आर्णी शाखेत गर्दी केली आहे.

जिल्हा बॅंक अध्यक्षांनी शब्द पाळला
कोणत्याही परिस्थितीत एफआयआर होणारच अशी भूमिका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी घेतली होती. हा शब्द अखेर त्यांनी खरा करून दाखविला. गुन्हे दाखल व्हावे म्हणून मंगळवारी त्यांनी काही संचालकांसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांचीही भेट घेतली.

Web Title: Criminal charges finally filed against four suspended in Arni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.