अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला खतपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 09:59 PM2018-02-19T21:59:54+5:302018-02-19T22:00:19+5:30
महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे.
विवेक पांढरे ।
आॅनलाईन लोकमत
फुलसावंगी : महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे. या अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून महागाव ठाण्याची गोपनीय शाखा कोलमडल्याचे दिसत आहे.
कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या आशेने अनेक तरुण या अवैध व्यवसायात गुंतले आहे. दारू, जुगार, मटका सर्वत्र उपलब्ध असल्याने तरुणांसोबतच अल्पवयीन मुलेही व्यसनांच्या आहारी जात आहे. अशा व्यवसायात गुरफटलेल्यांची तलब पूर्ण करण्यासाठी काही व्यसनाधीन तरुण चोºया आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे दिसत आहे. हा प्रकार महागाव तालुक्यातील प्रत्येक गावात घडत असताना महागावची गोपनीय शाखा मात्र कोलमडली आहे. जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून तालुक्यातून अनेक गुन्हेगारांना पकडले जाते. जे जिल्हास्तरावरील पथकांना कळते ते स्थानिक पोलिसांना कळू नये हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी क्राईम मिटींगमध्ये अवैध व्यवसायावर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. अशा व्यावसायिकांवर कठोर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक ठाणेदारांकडून कोलदांडा दिला जातो. उलट अवैध व्यावसायिकांना अभय पुरविले जाते.
महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या या अवैध व्यवसायाचा धसका अनेकांनी घेतला आहे. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकही चिंतेत आहे. पोलिसांनीच यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा गुन्हेगारीत वाढ निश्चितच होईल.
पुन्हा उगवले अवैध व्यावसायिक
महागाव पोलीस ठाण्याचा कारभार दोन महिने १५ दिवस परिविक्षाधीन अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे होता. ते रुजू होताच सर्व अवैध व्यावसायिक भूमिगत झाले होते. परंतु आता नवीन ठाणेदार रुजू झाले आणि भूमिगत झालेल्या व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर भर चौकात आपले व्यवसाय थाटले आहे.