निकष डावलून सुरू आहे ले-आऊटचा व्यवसाय
By admin | Published: March 6, 2015 02:06 AM2015-03-06T02:06:42+5:302015-03-06T02:06:42+5:30
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ले-आऊटच्या व्यवसायाला उधाण आले आहे. नियमबाह्यरीत्या शासनाचे निकष डावलून ले-आऊट पाडणे सुरू आहे.
कळंब : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ले-आऊटच्या व्यवसायाला उधाण आले आहे. नियमबाह्यरीत्या शासनाचे निकष डावलून ले-आऊट पाडणे सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अत्यल्प भावात जमिनी घेण्यावर ले-आऊट व्यावसायिकांचा जोर आहे. उल्लेखनीय म्हणजे शासनाच्या निकषाप्रमाणे ले-आऊट टाकताना आवश्यक त्या सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.
यवतमाळ-नागपूर या मुख्य मार्गावर तसेच चिंतामणीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या कळंब शहरातील जागेला गेल्या काही वर्षात अतिशय भाव आला आहे. त्यामुळे यवतमाळ-नागपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अनेकजण नियम डावलून केवळ पैशावर डोळा ठेवून हा व्यवसाय करत आहे. यामध्ये एकीकडे शासनाचा महसूल बुडत असतानाच दुसरीकडे प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकालाही त्याच्या हक्काच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. ले-आऊट टाकताना त्यामध्ये नाल्या, वीज, पाणी, पक्के रस्ते व इतर अनेक प्रकारच्या आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा ले-आऊटमालकानेच करून देणे आवश्यक आहे. परंतु शासनाचे हे निकष अनेकजण पाळत नसल्याचे दिसून येतात. प्लॉटची खरेदी झाल्यानंतर सोयीसुविधांबाबत हात वर केल्या जाते. अशावेळी प्लॉट खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)