अतिपावसाने जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 05:00 AM2021-07-24T05:00:00+5:302021-07-24T05:00:17+5:30
क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. काही भागात हा पाऊस क्षमतेपेक्षा जास्त झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जून महिन्यात पावसाने मासिक सरासरीच्या ११० टक्के पावसाची नोंद केली तर जुलैमध्ये कोसळणाऱ्या पावसाने १२५ टक्के मासिक सरासरी गाठली आहे. हा पाऊस पिकांना धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुढील काही दिवस नुकसानीचे पंचनामे सुरू राहणार आहे. यानंतर अंतिम अहवाल समोर येणार आहे.
क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. काही भागात हा पाऊस क्षमतेपेक्षा जास्त झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. किडींचे आक्रमणही झाले आहे. पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके पिवळी पडत आहेत. अतिपावसाने ही पिके करपण्याचाही धोका आहे. वाढ खुंटल्याने पिकाच्या उत्पन्नावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे.
जुलै महिन्याची सरासरी १९० मिमीची आहे. प्रत्यक्षात २३८ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस मासिक सरासरीच्या १२५ टक्के बरसला आहे. आणखी सात दिवसांचा कालावधी बाकी आहे.
प्रत्येक पिकाला पाण्याची आवश्यकता असते; मात्र निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाला तर तो पिकांना घातक असतो. सध्या याच परिस्थितीतून शेतकरी जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे जुलै महिन्यातील पावसात आणखी भर पडणार आहे. सततच्या पावसाने शेतशिवारातील कामे खोळंबली आहे. किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शेतशिवारात तणही वाढले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची दारव्हा, दिग्रस, पुसदमध्ये पाहणी
- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. अतिवृष्टीमुळे दारव्हा, दिग्रस, पुसद तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या तीनही तालुक्यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेटी देऊन बाधित भागाची पाहणी केली. तसेच तालुकास्तरीय समितीची सभा घेतली. नैसर्गिक आपत्ती आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे दोन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सहस्त्रकुंड, बेंबळा आणि निळोणा प्रतिबंधित क्षेत्र
- संततधार पावसामुळे उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि यवतमाळनजीक निळोणा धरण ओव्हर फ्लो होण्याच्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात धरण आणि धबधबा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशा गर्दी दरवर्षी जीवघेण्या अपघाताच्या घडतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्पांसह सहस्त्रकुंड धबधबा १ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.
दोन प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू
- जिल्ह्यात पूस प्रकल्पात ९६.७५ टक्के जलसाठा झाला आहे. अरुणावती ६२.७६, बेंबळा ६६.८९, गोकी ३९, वाघाडी ७२.२०, सायखेडा ८६.२८, अधरपूस ७०.५५, बोरगाव ४६.१४, अडाण ६३.०३, तर नवरगाव धरणात ४४.३१ टक्के जलसाठा झाला आहे. तर बेंबळाचे दोन गेट १० सेमीने उघडून २० क्यूसेक तसेच अडाणचे पाच गेट ५ सेमीने उघडून २४.७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.