ढिगाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:15 PM2018-08-22T22:15:53+5:302018-08-22T22:16:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे पाणी अडून शेतात शिरल्यानेही असंख्य शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली. त्यामुळे नैसर्गीक आपत्तीसोबतच वेकोलिच्या आडमुठ्या धोरणाचाही फटका शेतकºयांना बसला.
वणी परिसरात वेकोलिचा पसारा वाढला आहे. बहुतांश खाणी खुल्या स्वरूपाच्या असून त्यातील अधिक खाणी वर्धा व विदर्भा नदीच्या काठावर आहे. खुल्या खाणीतील कोळसा काढण्यापूर्वी उपसावी लागणारी माती वेकोलिने नियम डावलून टाकली आहे. त्याचे मानवनिर्मीत पर्वत तयार झाले आहेत. नदी नाल्यांचा प्रवाह व पुराचा विस्तार लक्षात न घेता ढिगारे टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ढिगाऱ्यांना नदी-नाल्यांच्या पुराचे पाणी अडून त्याचे बॅकवॉटर शेतांमध्ये प्रवेश करतात.
उकणी, बेलोरा, नायगाव, मुंगोली, जुगाद, कोलगाव, साखरा, घोन्सा या गावच्या अनेक शेतांमध्ये गेल्या १५ दिवसात पाणी शिरले. त्यामुळे पिके दोन दिवस पाण्याखाली राहिली. पिके सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे कित्येक गावांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आला की, गावकऱ्यांच्या उरात धडकी भरते. जुगाद, कोलेरा, मुंगोली या गावांना पुराचा वेढा पडतो. वेकोलिने या गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकरी कित्येक वर्षांपासून करीत आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
१०-१२ खाणीपैकी काही खाणी बंद अवस्थेत आहे. तरीही त्याचे ओव्हरबर्डन पर्वत रूपाने व खाण दरी रूपाने कायम आहेत. बंद पडलेल्या खाणी बुजवून पूर्ववत जमीन सपाट केल्यास अनेक धोके टळू शकतात. विदर्भा नदीला नुकताच आलेला पुर घोन्सा खणीचे ओव्हरबर्डन फोडून खाणीत शिरला. त्यामुळे घोन्सा खाण दोनदा पुराच्या पाण्याने डच्च भरली. नदी काठावरील ढिगारे नदीत घसरू लागल्याने काही ठिकाणी वर्धा नदीचे पात्र अरूंद होत आहे. यामुळेही पुराचा विस्तार वाढून शेती पाण्याखाली येत आहे. वेकोलिच्या मनमानी कारभारावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध न घातल्यास भविष्यात धोके वाढण्याची शक्यता आहे.