पीक विमा आता मंगळवारपर्यंत
By admin | Published: July 31, 2016 01:03 AM2016-07-31T01:03:01+5:302016-07-31T01:03:01+5:30
पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत आता मंगळवार २ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कृषी अधीक्षक : लाखो शेतकऱ्यांना दिलासा
यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत आता मंगळवार २ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी केले आहे. पीक विम्याला मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना अल्पसा का होईना दिलासा मिळाला आहे.
पूर्वी पीक विम्याची अंतिम मुदत ३० जुलै होती. ती आता २ आॅगस्ट करण्यात आली. तसा आदेश २९ जुलै रोजीच जारी करण्यात आला. आधीच दिवस कमी आणि त्यात शासकीय सुट्या असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातूनच पीक विम्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. वास्तविक शेतकऱ्यांनी ही मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविली जावी, अशी मागणी केली आहे. परंतु शासनाने केवळ २ आॅगस्टपर्यंत ती वाढविली आहे. शासकीय सुट्यांच्या दिवशी कामकाज न झाल्याने त्याचीही वाढीव मुदत म्हणजे भरपाई असल्याचे मानले जात आहे.
या मुदतवाढीमुळे ३० जुलैला अंतिम अहवाल पाठविण्याच्या सक्तीपासून बँकांची मुक्तता झाली आहे. बँकांसह शेतकऱ्यांपुढील मोठा तणाव कमी झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळाने बँका अडचणीत सापडल्या होत्या. (शहर वार्ताहर)