बनावट कागदपत्रांच्याआधारे पीक कर्ज उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:13+5:302021-07-31T04:42:13+5:30
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचलण्यात आले. ...
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर पीक कर्ज उचलण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्षेत्राबाहेरील महागाव तालुक्यातील साई (इजारा) येथील शेतकऱ्याच्या नावाचा त्यासाठी वापर करण्यात आला.
साई (ईजारा) ता. महागाव) येथील शेतकरी सुभाष विष्णू राठोड यांनी काळी (दौ) येथील युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये कर्जासाठी धाव घेतली. १९ जुलैरोजी ते पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत गेले. तेथे त्यांच्या मागील कर्जाचा आढावा घेताना सिबिल ६३९ एवढा असल्याचे सांगण्यात आले. अपाण पीक कर्ज पूर्वीच उचल केल्याने अपात्र असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
शेतकरी सुभाष राठोड यांना यामुळे धक्का बसला. त्यांनी स्वतःच्या नावाने ऑनलाईन सिबिल केला व खात्याची प्रत काढली असता, कलगाव ता. दिग्रस येथील बँक ऑफ बडोदामधून त्यांच्या नावे बनावट कर्ज प्रकरण सादर करून एक लाख १७ हजार रुपये उचलल्याचे दिसून आले. त्या खात्यात ७५ हजार ५६२ रुपये शिल्लक दाखवण्यात आले. हे बघून आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री पटली. या बनावट कर्ज खात्याचे शेवटचे चार अंक १४०४ असे आहेत. सुभाष राठोड हे महागाव तालुक्यातील शेतकरी असून, त्यांच्या नावाने बनावट पीक कर्ज दिग्रस तालुक्यातील बँकेतून उचलण्यात आले, हे विशेष. संबंधित शाखा व्यवस्थापकांशी प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
बॉक्स
कार्यक्षेत्र नसताना बँकेने दिले कर्ज
आपले कार्यक्षेत्र नसताना कलगाव येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेने महागाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या नावे पीक कर्ज कसे मंजूर केले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सुभाष राठोड यांनी २० जुलैरोजी कलगाव शाखेत जाऊन चौकशी केली असता, शाखा व्यवस्थापकांनी या प्रकरणाची माहिती देण्यास नकार दिला. पीक कर्ज घेणाऱ्याची माहिती व संबंधित दाखल कागदपत्र याबाबत विचारपूस केली असता, माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी राठोड यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा सहकार अधिकारी, बँक शाखा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिलीे.
कोट
माझी शेती व राहणे साई (इजारा) ता. महागाव) येथे आहे. कलगाव ता. दिग्रस येथील बँकेशी माझा कोणताही संबंध नाही. तेेथील शाखा व्यवस्थापक पवन गावंडे यांची भेट घेतली असता, त्यांनी कर्ज तूच घेतले, असे सांगून ते माझ्या हातचे नसून, आधीच्या मागील साहेबांच्या काळातील असल्याचे सांगितले.
सुभाष विष्णू राठोड,
शेतकरी, साई (इजारा) ता. महागाव.