पुसद तालुक्यात ६९ हजार हेक्टरवरील पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:49+5:302021-07-05T04:25:49+5:30

प्रकाश लामणे पुसद : तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ६९ हजार ८२९ हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात ...

Crops on 69,000 hectares in Pusad taluka in crisis | पुसद तालुक्यात ६९ हजार हेक्टरवरील पिके संकटात

पुसद तालुक्यात ६९ हजार हेक्टरवरील पिके संकटात

Next

प्रकाश लामणे

पुसद : तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ६९ हजार ८२९ हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी तालुक्यातील पिके होरपळत असल्याचे चित्र असून, तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे.

तालुक्यात खरीप पिकाच्या लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८२९ हेक्टर आहे. तालुक्यातील बराच भाग डोंगराळ असल्याने या भागातील शेतजमीन हलकी व मुरमाड आहे. त्यातच सिंचन व्यवस्था हवी त्या प्रमाणात नसल्याने अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या आशेने पेरणी पूर्ण केली. परंतु मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिके होरपळत आहेत.

यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. तब्बल २४ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होऊन सोयाबीन एक क्रमांकावर आहे. १८ हजार ७०० हेक्टरवर पेरा होऊन कपाशी दुसऱ्या स्थानावर आहे. यंदा बियाण्यांच्या किमती गगनाला भिडल्याने मशागतीचे भावसुद्धा वधारले आहे. त्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट घोंघावत आहे.

बॉक्स

पिकांसह शेतकऱ्यांचीही होरपळ सुरू

तालुक्यावर निसर्ग कोपल्याची बळीराजाची भावना झाली आहे. तालुक्यातील शेतकरीही पिकांसह होरपळत असल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. आधीच महागडे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता पावसाने डोळे वटारले. मशागतीच्या वाढलेल्या दरानेही आम्ही हवालदिल असल्याचे वरुड येथील शेतकरी संभाजी टेटर यांनी सांगितले.

Web Title: Crops on 69,000 hectares in Pusad taluka in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.