दारव्हा तालुक्यात आठ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:26 AM2021-07-12T04:26:24+5:302021-07-12T04:26:24+5:30
--व्यवसायीक, घरांचे नुकसान, वाहतुक ठप्प, गावांचा संपर्क तुटला फोटो दारव्हा : तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने १०५ गावांना ...
--व्यवसायीक, घरांचे नुकसान, वाहतुक ठप्प, गावांचा संपर्क तुटला
फोटो
दारव्हा : तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने १०५ गावांना जबर तडाखा बसला. सात हजार ७१५ हेक्टरवरील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. २७७ घरांची पडझड झाली. दुकानात पाणी शिरले, रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला.
रविवारी सकाळी शहरात मुख्याधिकारी धीरज गोहाड, तर ग्रामीणमध्ये तहसीलदार सुभाष जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. दुपारपर्यंत प्राथमिक अहवाल देण्यात आला. संपूर्ण सर्व्हेनंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह तुफान बरसला. केवळ दोनच तासात ११० मि.मी. पाऊस पडल्याने शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांसह ग्रामीण भागातील शेती, घरांचे मोठे नुकसान झाले.
तालुक्यात काही गावात ढगफुटीसारखा पाऊस पडला. नदी, नाल्याकाठच्या गावात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके वाहून गेली. जमीन खरडून गेली. दारव्हा, लाडखेड, महागाव, बोरी, लोही, चिखली, मांगकिन्ही या ७ मंडळातील १०५ गावांतील सात हजार ७१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. २७७ घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. दारव्हा-यवतमाळ राज्य मार्गावरील निर्माणाधीन पुलाच्या बाजूला काढण्यात आलेल्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंतही रस्ता दुरुस्ती न करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होऊ शकली नव्हती. बोरी-हातगाव मार्गासह काही गावात नदी, नाल्यांना पूर आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला. रविवारी महसूलच्या कर्मचाऱ्यांनी गावागावात दाखल होऊन सर्वेक्षणाला सुरुवात केली. आता नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मदतीबाबत काय निर्णय घेतला जातो, याची नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा आहे.
बॉक्स
शहरातील रस्त्यावर कंबरभर पाणी
शहरातील लेंडी नाल्याचे पाणी आजुबाजूच्या परिसरात शिरल्याने यवतमाळ, आर्णी हे प्रमुख मार्ग, तसेच गोळीबार चौक, बसस्थानक चौकात कंबरभर पाणी साचले होते. या भागाला नदी, नाल्याचे स्वरूप आले होते. दुकाने अर्ध्याअधिक प्रमाणात पाण्याखाली गेली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नातूवाडी, अंबिकानगरसह विविध परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. नाल्याचे खोलीकरण, बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे व्यावसायिक, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
110721\img-20210711-wa0088.jpg
दारव्हा तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला