पांढरकवडात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान, कापूस भिजू लागला : बोंडे सडू लागली, वाढही खुंटली, सोयाबीनला कोंब फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:45 AM2021-09-26T04:45:58+5:302021-09-26T04:45:58+5:30
शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ...
शेतातून निघालेली कपाशी भिजू लागली आहे, तर अनेक ठिकाणी कपाशीचे बोंड सडण्याचे तसेच काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचत असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहात असल्याने व हवेतील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीन पिकाची व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. सुरूवातीला पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असताना पावसाने धडाका सुरू केला व अद्यापही वरूणराजाची अवकृपा सुरूच आहे. पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने चिंतेत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहे. २३ सप्टेंबरला हिवाळ्याची सुरूवात झाली असली, तरी पाऊस दरदिवशीच बरसत असल्याने शेतातील कपाशीची बोंडे अनेक ठिकाणी सडून पडत आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस फुटला असून, तो ओला होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. वातावरणात सतत आर्द्रता असल्याने रोगांचेही प्रमाण वाढू लागले आहे. या सर्व बाबींमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाच्या नजर पाहणीत सोयाबीन व कपाशीचेही नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या पावसाने नुकसान झाले आहे, त्यांच्याकडून शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. पुढील काही दिवस आणखी पाऊस पडला तर पिकांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.
कोट : शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करावा. जेणेकरून पिकांची वाढ होईल व उघडीप मिळताच सोयाबीनची कापणी करून घ्यावी. तसेच रोगांसाठी बुरशीनाशकाचा वापर करावा, जेणेकरून पिकांचे नुकसान होणार नाही.
- आर. आर. दासरवार, तालुका कृषी अधिकारी, पांढरकवडा.
कोट : कपाशी फुटली असून, पावसाने भिजून जात आहे. सततच्या पावसाने बोंडं काळी पडली असून, शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आणखीन नुकसान होत आहे.
- प्रा. अजय सोळंके, प्रयोगशील शेतकरी, पांढरकवडा.