पोळा सणाच्या तोंडावर २१ लाख शेतकरी वाऱ्यावर; मंत्र्यांचे केवळ दौरे, मदत केव्हा मिळणार?
By रूपेश उत्तरवार | Published: August 23, 2022 11:55 AM2022-08-23T11:55:39+5:302022-08-23T11:57:53+5:30
१८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
यवतमाळ : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जुलैपर्यंत राज्यातील १५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. आता ऑगस्टच्या मध्यात नुकसानीचा आकडा तीन लाख ७५ हजार हेक्टरने वाढून १८ लाख ७५ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. अद्याप पंचनामे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाकडून एक दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मंत्री केवळ पाहणी दौरे करण्यातच वेळ घालवित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पोळा सणाच्या तोंडावर राज्यातील २१ लाख शेतकरी वाऱ्यावर आहेत.
राज्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असली तरी सर्जा-राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी विदर्भ, मराठवाडा क्षेत्रात ९ ते १० वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यांना उभारी देण्याची आवश्यकता असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. मदत मिळत नसल्याने शेतकरी पुरते खचले आहेत.
नवीन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर दुप्पट आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची थाटात घोषणा करण्यात आली. परंतु त्याबाबतचे लेखी आदेश अद्याप निघाले नाहीत. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची आवश्यकता होती. मात्र, मदत न देता मंत्र्यांचे केवळ दौरे झाले. त्यांनीही केवळ विचारपूस करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
विदर्भ आणि मराठवाड्यात कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाकरी खाल्ल्या. यामुळे ते पाेटतिडकीने समस्या सोडवतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्यापही कुठलीही मदत मिळाली नाही. जून ते जुलै अखेरपर्यंत राज्यात १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. १९ हजार हेक्टर जमीन खरडून गेली. हा अहवाल ताजा असताना निसर्ग संकट कायम आहे. पुन्हा अतिवृष्टीने २० जिल्ह्यांत तीन लाख ७४ हेक्टरचे नुकसान केले. नुकसानीचा हा आकडा आता १८ लाख ७४ हजार हेक्टरच्या घरात आहे.
पोळा साजरा करायचा कसा
निसर्ग प्रकोपाने शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. घरात पैसा उरला नाही. कर्ज काढून पेरणी केली होती. आता नव्याने घर चालवायला पैसे नाही. अशा स्थितीत सर्जा-राजाचा पोळा सण साजरा करावा कसा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांत निर्माण झाला आहे. यामुळे गाव शिवारावर अवकळा पसरली आहे.
१५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १५ दिवसांत ७५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नव्याने नोंद झाली. जिल्ह्याचा नुकसानीचा आकडा पावणेचार लाख हेक्टरवर पोहोचला आहे. आताही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.