पिके जोमात, तलाव मात्र कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:15 PM2019-08-29T22:15:32+5:302019-08-29T22:15:56+5:30
ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून पावसाने अनियमितता दाखविली. पिकांलायक पाऊस झाल्याने पिके तग धरून आहे. त्यामुळे शिवार हिरवे दिसत असले तरी नदी-नाले मात्र करोडे आहे. शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. चाऱ्याचा प्रश्न मिटला. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. तालुक्याात लहान-मोठे ५० च्यावर तलाव आहे. या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. पूस धरणात केवळ ३९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला साचलेल्या पावसावरच मुक्या जनावरांना तहान भागवावी लागत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात ३९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला. मात्र मुक्या जनावरांची निसर्गाकडून कुचेष्टा होत आहे.
तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या हजेरीमुळे सध्या नयनरम्य वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या खोल दऱ्या, हिरवाईने नटलेला डोंगर बघितल्यानंतर येणारा-जाणारा व्यक्ती प्रफुल्लीत होत आहे. चोहीकडे हिरवळ पसरलेली आहे. त्यात विविध प्रकारची फुले, तलाव यामुळे तर या भागावरून नजर हटत नाही. डोंगरमाथ्यावरून परिसरातील तलाव, शेत शिवारांचे मनोहारी दर्शन घडते.
यावर्षी जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसाने कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे शेतशिवार हिरवे दिसून येत असले तरी तलाव, पाणवठे, नदी, नाले कोरडेच आहे. यंदा काही प्रमाणात विहिरी, बोअर यांना पाणी आहे. मात्र हे पाणीही पुढे पुरेल याची शक्यता नाही.
आता उरला केवळ एक महिना
आॅगस्ट महिना आता संपत आला. जेमतेम एक महिना पावसाळा उरला आहे. या काळात जर मोठा पाऊस पडला नाही, तर गेल्यावर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. दररोज आकाशात ढगांची दाटी होते. मात्र पाऊस वारंवार हुलकावणी देत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी नदी-नाले वाहणे गरजेचे आहे.