पुसद तालुक्यात शेतात पाणी साचल्याने पिके पडली पिवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:35 AM2021-07-25T04:35:06+5:302021-07-25T04:35:06+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात दिवस, रात्र पाऊस सुरू आहे. या पावसाने जमिनी संपूर्णपणे चिबडल्या आहेत. पुसद शहर, ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात दिवस, रात्र पाऊस सुरू आहे. या पावसाने जमिनी संपूर्णपणे चिबडल्या आहेत. पुसद शहर, माळपठार, बांशी, मुंगशी, ब्राह्मणगाव, पारवा, पांढुर्णा यासह अनेक गावांत सतत पाऊस पडत आहे. या पावसाने बहरलेल्या पिकांमध्ये पाणी साचले आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत.
आतापर्यंत झालेल्या पावसाने मिरचीचे पीक सडले आहे. शेतात गवत जोमात अन् पिके कोमात गेली आहेत. गवतात पाण्यात तग धरून बसलेल्या मक्याने कणसे टाकली. मात्र, त्यावर अळीने विळखा घातल्याने लागवड बियाण्याचा खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. पिके वाचवावी म्हणून शेतकरी पिकातून बाहेर पाणी काढण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र, शेतात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने जमिनी चिबडल्या आहेत. या जमिनीत मशागत करणे अवघड झाले आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मका, कपाशीची वाढ खुंटली आहे.
बॉक्स
खताच्या तुटवड्याने संकटात भर
तालुक्यात खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना दुकानात युरिया मिळत नाही. त्यामुळे खतासाठी त्यांना विविध ठिकाणी वणवण भटकावे लागत आहे. कर्ज, उसणवारी करून पेरणी केलेला खर्च पाण्यात जात आहे. शासनाने काही तरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे. दरम्यान, पावसामुळे विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.