अतिवृष्टीमुळे पीक गेले; यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 05:34 PM2022-10-17T17:34:38+5:302022-10-17T17:39:08+5:30
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाती आलेला हंगाम हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना महागाव तालुक्यातील दहिवड (खुर्द) येथे, तर दुसरी घटना पुसद तालुक्यातील भंडारी येथे घडली.
मनोहर नारायण पवार (३४), असे दहिवड (खुर्द) येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे ते निराश होते. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या मनोहर पवार यांनी शनिवारी सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, तीन मुली व आप्त परिवार आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
पुसद तालुक्यातील भंडारी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत अशोक सखाराम आडे (४४), असे भंडारी येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री त्यांनी स्वत:च्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावला. ही घटना १४ ऑक्टोबरला उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांना घटनास्थळ गाठून मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद शेळके, श्याम घुगे, अनिल राठोड तपास करीत आहेत. तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांचा अहवाल आल्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास जास्तीत जास्त मदत मिळावी, याकरिता प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्यांची दखल घ्यावी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी मृत शेतकरी मनोहर नारायण पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अति पावसाने शेतकरी उघड्यावर आले आहेत. मात्र, शासन कुंभकर्णी झोपेत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाईसुद्धा थंडबस्त्यात आहे. शासनाच्या कोरड्या घोषणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचले असून, शेतकरी आत्महत्यांची दखल मानवाधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघाने घ्यावी, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.