निकृष्ट कालव्याचा फटका
By admin | Published: August 13, 2016 01:27 AM2016-08-13T01:27:41+5:302016-08-13T01:27:41+5:30
सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहे.
शेतात पाणी शिरले : वडकी परिसरात कामे अर्धवट
वडकी : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. कालव्यांची कामे निकृष्ट आणि अर्धवट झाल्याने पिकात पाणी शिरून नुकसान होत आहे. वडकी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून कालव्याची कामे हाती घेण्यात आली. ही कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणची कामे निकृष्ट झाली. कालव्याद्वारे वाहणारे पावसाचे पाणी थेट शेतात शिरले आहे. अनेक शेतांना नाल्याचे स्वरूप आले आहे. संपूर्ण पीक खरडून गेल्याचे चित्र काही शेतात दिसून येते.
वडगाव येथील विठ्ठल फुटाणे यांच्या चाचोरा शिवारातील शेतामध्ये कॅनॉलचे पाणी शिरले. शेताच्या अगदी मध्यभागातून पाणी वाहात असल्याने संपूर्ण पीक खरडून गेले आहे. अशीच परिस्थिती परिसरातील इतर शेतांचीही आहे. कालव्यांची कामे निकृष्ट झाल्याने हे मानवनिर्मित संकट सदर शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. कालव्याद्वारे वाहणारे पावसाचे पाणी अडवून नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांमधून होत आहे. (वार्ताहर)