चिंतामणी जन्मोत्सवात सांस्कृतिक मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:50 PM2019-02-25T21:50:20+5:302019-02-25T21:50:36+5:30
येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणीच ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणीच ठरला.
प्रवचन, कीर्तन, द्वारयात्रा मिरवणूक, दीपयज्ञ, महाप्रसाद, गणेश यज्ञ, साग्रसंगीत, महाअभिषेक, हरिपाठ, दहीहांडीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवात पार पडले. सत्यसाई सेवा समितीद्वारे अतिशय सुंदर साईभजन सादर करून भाविकांची मने जिंकली. ‘हास्यकवी संमेलनातून’ आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. कवी किरण जोशी, कपिल बोरुंदिया, डॉ.संतोष मुजुमदार व नम्रता नमिता यशस्वी ठरले.
सुधीर महाजन व संचाने ग.दी. मांडगुळकर यांचे ‘गीत रामायण’ सादर केले. पूर्वी रेडीओवर ऐकलेल्या गीत रामायणाची यानिमित्ताने प्रत्यक्ष आठवण झाली. प्रवीण तिखे यांचा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा तुफान विनोदी कार्यक्रम हास्याचे कारंजे उडविणारा ठरला. हलक्या फुलक्या विनोदातून सामाजिक संदेशही देण्यात ते विसरले नाही. शिल्पा निशीकांत थेटे यांच्या मार्गदर्शनात ‘नुपुर’ या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. हास्य कलावंत अरविंद भोंडे यांचा ‘कार्यक्रम असा की पोटभर हसा’ हा कार्यक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून चेहºयावर हास्य फुलविणारे हे सर्वच कार्यक्रम प्रेक्षक व भाविकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असेच होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर आदींनी पुढाकार घेतला.