राळेगावच्या सांस्कृतिक भवनाचे काम रखडले
By admin | Published: July 11, 2017 01:15 AM2017-07-11T01:15:05+5:302017-07-11T01:15:05+5:30
येथील सांस्कृतिक भवनाचे काम गत आठ वर्षांपासून रखडले असून, एक कोटीचे बांधकामहोऊनही सदर भवन निरुपयोगीठरले आहे.
आठ वर्षांपासून प्रतीक्षा : नगरपंचायत झाल्याने कामाकडे दुर्लक्ष
के. एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील सांस्कृतिक भवनाचे काम गत आठ वर्षांपासून रखडले असून, एक कोटीचे बांधकाम
होऊनही सदर भवन निरुपयोगी
ठरले आहे. विशेष म्हणजे नगरपंचायत झाल्यापासून जिल्हा परिषद
बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अगदी समोर आणि तहसील व बाजार समितीला लागून असलेल्या एक एकरापेक्षा अधिक जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांच्या या जागेवर जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला. गत आठ वर्षांपासून या भवनाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भवन कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालिन मंत्री वसंतराव पुरके यांच्या कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सात-आठ वर्षात दरवर्षी दहा लाख रुपये एवढी तोकडी तरतूद करण्यात आली. त्या काळात बांधकाम मूल्य सतत वाढत असल्याने काम पूर्णत्वास गेले नाही. सध्यास्थितीत या इमारतीचा सांगाडा तेवढा शिल्लक दिसत आहे. भटके लोक धर्मशाळा आणि निवाऱ्यासाठी त्याचा उपयोग करतात.
दीड वर्षापूर्वी राळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. तर नगरपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी याच्यात समन्वय दिसत नाही. त्यामुळे सातत्याने पाठपुरावा झाला नाही. आता ही इमारत कधी पूर्ण होईल आणि नागरिकांच्या उपयोगात कधी येईल याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.
ठेकेदार, अधिकारी, पदाधिकारी यांचे यात भले झाले असले तरी मुळ उद्देश मात्र पूर्ण झालेला नाही. संबंधित विभागाने या सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी राळेगाव येथील जनता करीत आहे.