सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात उमेदवार कोण, याचीच उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:11 AM2019-09-06T04:11:04+5:302019-09-06T04:11:34+5:30
महत्त्वपूर्ण कामे त्यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास नेली आहे.
राजेश भोजेकर
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे हेवीवेट नेते अर्थ, नियोजन वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. या मतदार संघातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातील. या मतदारसंघात काँग्रेसच तुल्यबळ पक्ष असला तरी त्यांना टक्कर देणारा तगडा उमेदवारच पक्षाकडे नाही. येत्या १५-२० दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी पाच वर्षांपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली आहे.
महत्त्वपूर्ण कामे त्यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास नेली आहे. शिल्लक असलेली कामे गतीने सुरू आहे. याचाच अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीत ते विकासकामे दाखवून जनतेला मते मागतील हे सर्वश्रूत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार द्यायचा झाल्यास तो त्याच तोडीचा असावा लागणार. परंतु निवडणूक जवळ येत असताना अद्याप एकही दमदार नाव काँग्रेस गोटातून पुढे आलेले नाही. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी हे पुन्हा इच्छुक आहेत, तर जागा आपल्याला मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य हे पक्षश्रेष्ठींकडे गळ घालत आहेत. काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदू नागरकर हे सुद्धा रांगेत आहेत. काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष संतोष रावतसुद्धा इच्छा बाळगून आहेत. बीएसपीनंतर बीआरएसपीतून बाहेर पडलेले राजू झोडेंचा आता काँग्रेस तिकीटावर डोळा आहे. बल्लारपूर तालुका माहेर असलेल्या नागपूर येथून राष्ट्रीयस्तरावर सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिला उमेदवारालाही काँग्रेस पुढे आणू शकेल, असेही बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी ऐनवेळी हा मतदारसंघ बीएसपीला सोडला जाण्याची शक्यता आहे. जर कदाचित बीएसपीसोबत काँग्रेसची आघाडी झाली तर!
पाच वर्षांत काय घडले?
च् गेल्या दहा वर्षांपासून या मतदार संघाचे नेतृत्व करीत असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी या मतदार संघातील मूल, बल्लारपूर व पोंभूर्णा या तीनही तालुक्यांचा चेहरामोहरा बदलविला.
च्आदिवासी भगीनींसाठी कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, दुथपिक व अगरबत्ती निर्मितीचा उद्योग उभारून त्यांना रोजगार दिलेला आहे. इतर कामेही लक्ष वेधणारी आहे.
च्राजू झोडे यांनी बीएसपीनंतर बीआरएसपीमध्ये प्रवेश करून आंदोलनांच्या माध्यमातून जनतेचे
लक्ष वेधले होते. बीआरएसपीलाही जयभीम करीत उलगुलान संघटना स्थापन करून काँग्रेसच्या
उमेदवारीवर डोळा ठेवून आहे.
च्स्थानिक स्वराज संस्था भाजपकडेच. पाच वर्षांत काँग्रेस कधीही
प्रभावीपणे पुढे येताना दिसली नाही.
निवडणूक २०१४
सुधीर मुनगंटीवार (भाजप)
१,०३,७२८ मते
घनश्याम मुलचंदाणी (काँग्रेस)
६०,११८ मते
राजेश सिंग (बसपा)
१०,३४४ मते
संभाव्य प्रतिस्पर्धी
घनश्याम मुलचंदानी (काँग्रेस)
नंदू नागरकर (काँग्रेस)
राजेंद्र वैद्य (राकाँ)
राजू झोडे (अपक्ष)
निवडणूक दर पाच वर्षांनी येते. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जावू नये, असा विकास मतदार संघात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निवडणुकीत विरोधात कुणीही असेल. त्याची तुलना मतदार संघातील जनता गेल्या पाच वर्षातील विकास कामांशी करेल.
- सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर मतदारसंघ.