कुलर ग्राहकांच्या प्रतीक्षेत अन् ग्राहक पाण्याच्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:22 PM2018-03-15T23:22:27+5:302018-03-15T23:22:27+5:30
पाणी कोणत्याही आकारात स्वत:ला ‘अॅडजस्ट’ करून घेते. म्हणूनच आता पाणीटंचाईने यवतमाळकरांना ‘अॅडजस्टमेंट’ शिकवणे सुरू केले आहे. अर्धा मार्च उलटला तरी कोणाचेही कुलर खिडक्यांमध्ये अवतरलेले नाही.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : पाणी कोणत्याही आकारात स्वत:ला ‘अॅडजस्ट’ करून घेते. म्हणूनच आता पाणीटंचाईने यवतमाळकरांना ‘अॅडजस्टमेंट’ शिकवणे सुरू केले आहे. अर्धा मार्च उलटला तरी कोणाचेही कुलर खिडक्यांमध्ये अवतरलेले नाही. तर कुलर विक्रेतेही हातावर हात देऊन बसलेले आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्ये २० टक्के कुलर विक्री झालेली असताना यंदा मात्र पाच टक्केही कुलरचा उठाव झालेला नाही. भर उन्हात दुकानातील कुलर ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत अन् ग्राहक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तापमानाने आता चाळीशीकडे वाटचाल सुरू केली आहे. रात्री उकाडा सतावू लागला आहे. तरीही अगतिक यवतमाळकर जनता कुलर वापरणे टाळत आहे. दरवर्षी होळी आटोपताच अडगळीतले कुलर झाडपूस करून खिडक्यांमध्ये उभे केले जातात. यंदा मार्च अर्धा संपला आणि तापमान वधारले तरी, कुलर अडगळीतच आहेत. २० दिवसांतून एकदा पाणी मिळणाऱ्या यवतमाळकरांना सध्या अंघोळीचे वांदे झालेले आहेत. अशावेळी कुलरसाठी दरदिवशी किमान २०० लिटर पाणी आणावे कुठून हा प्रश्न आहे.
नागरिकांप्रमाणेच पाणीटंचाईने कुलरविक्रेत्यांनाही जोरदार फटका दिला आहे. यवतमाळात १५-२० कुलरविक्रेत्यांची दरवर्षी ‘सिझन’मध्ये चांदी असते. गेल्या वर्षी जानेवारीमध्येच सिझन सुरू झाला होता. यंदा अर्धा मार्च संपूनही कुलर विक्री झालेली नाही, अशी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
आता लग्नसराईवरच आशा
यवतमाळचे मार्केट दरवर्षी १० हजार डेझर्ट कुलर विक्री करते. यंदा मात्र दहा-विस कुलरही खपलेले नाही, अशी खंत एका विक्रेत्याने व्यक्त केली. मार्केटमधील एकूण कुलरपैकी अर्धे कुलर मार्चमध्येच संपून जातात. पण यंदा मे महिन्यापर्यंत ५० टक्केही कुलर घेतले जातील की नाही, अशी भीती विक्रेत्यांना वाटत आहे. लग्नात मात्र आहेर म्हणून प्रत्येक नवरीला कुलर दिला जातोच. त्याच भरवशावर यंदाचा सिझन आहे, असे मत एका विक्रेत्याने व्यक्त केले.
डेझर्ट कुलर इन्स्टॉलमेंटवर
यवतमाळप्रमाणेच नागपूर, अमरावतीसारख्या ठिकाणीही यंदा कुलरला उठाव नाही. एक विक्रेता म्हणाला, दरवर्षी मी डेझर्ट कुलर बनविण्यासाइी नागपुरातून माल बोलावतो. पण अॅडव्हान्स भरूनही वेळेवर माल मिळत नव्हता. यंदा मात्र मी मागणी न करताही माल येऊन पडला आहे. तणीस, खस, पंखे, बॉडी, मोटर या गोष्टी नुसत्या पडून आहे. जे कुलर तयार केले, तेही कुणी घ्यायला तयार नाही. आता हे कुलर इन्स्टॉलमेंटवर देण्याची मी तयारी केली आहे. मात्र इन्स्टॉलमेंटवरही न्यायला कुणी तयार नाही.