‘गो ग्रीन’ला ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद
By admin | Published: January 21, 2017 01:24 AM2017-01-21T01:24:25+5:302017-01-21T01:24:25+5:30
महावितरणचे वीजबिल आॅनलाईन भरण्याकडे आता वीज ग्राहकांचा ओढा वाढला आहे. लाखो वीजग्राहक आॅनलाईन वीज बिलाचा भरणा करीत आहेत.
आॅनलाईनला पसंती : ई-मेलवरील बिलाकडे फिरविली पाठ
सुहास सुपासे यवतमाळ
महावितरणचे वीजबिल आॅनलाईन भरण्याकडे आता वीज ग्राहकांचा ओढा वाढला आहे. लाखो वीजग्राहक आॅनलाईन वीज बिलाचा भरणा करीत आहेत. परंतु, पर्यावरणपूरक अशा महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेला आवश्यक प्रतिसाद मिळत नाही.
महावितरणने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेची अद्यापही ग्राहकांना माहिती नाही. वीज ग्राहकांना कागदी बिल न पाठविता त्यांना दर महिन्याच्या वीज बिलाची प्रत ई-मेलद्वारे पाठविणे यातून कागद वाचवून पर्यावरणाचे संवर्धन करणे ही संकल्पना म्हणजेच ‘गो ग्रीन’ योजना आहे. उल्लेखनीय म्हणजे या पेपरलेस योजनेचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणात योगदान देणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक बिलात तीन रुपये सुट महावितरणकडून देण्यात येते. तरीदेखील ग्राहकांचा योजनेला प्रतिसाद नाही. कारण बहुतांश ग्राहकांना ही योजनाच माहीत नसल्याचे अनेकांनी सांगितले. या उपक्रमाबाबत यवतमाळ महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, तेदेखील अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यांनी लेखापालाशी संपर्क साधण्यास सांगितले.
या योजनेअंतर्गत वीजग्राहकांना ई-मेलद्वारा वीजदेयके पाठविण्यात येतात. त्यामुळे बिलाच्या छपाईसाठी लागणारा कागद, तसेच बिल वाटपासाठी येणाऱ्या खर्चात महावितरणची बचत होऊ शकते. सोबतच पर्यावरण संवर्धनासही मदत होते. त्यातही ग्राहकाला बिल हवेच असल्यास ई-मेलद्वारे आलेल्या बिलाची प्रिंट काढून ग्राहक कोणत्याही बिल भरणा केंद्रावर बिल भरू शकतात. तसेच त्याची प्रतही स्वत:कडे ठेवू शकतात. घरगुती वीज ग्राहकांची एकूण संख्या जवळपास पावणे नऊ लाखांच्या घरात आहे. परंतु, गो ग्रीनमध्ये सहभागी झालेले ग्राहक अमरावती जिल्ह्यात केवळ ३१ व यवतमाळ जिल्ह्यात केवळ सात आहेत.