आशुतोषच्या खुनामागे २० लाख खंडणीचा कट
By admin | Published: January 6, 2016 03:02 AM2016-01-06T03:02:02+5:302016-01-06T03:02:02+5:30
दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनामागे त्याच्या वडिलांकडून २० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा कट होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
बघा, दोन मित्रांनीच केला घात : आधी अपहरण करून आवळला गळा, नंतर मृतदेह जाळला
दारव्हा : दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनामागे त्याच्या वडिलांकडून २० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा कट होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आशुतोषचे अपहरण करून आधी खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. यातील एकाचा केवळ वाहन चोरीत सहभाग आढळून आला.
अक्षय सुरेश तिरमारे (१९) रा. उत्तरेश्वर चौक, दारव्हा व सौरभ प्रकाश दुर्गे (१८) रा. तरोडा ता. दारव्हा अशी खुनातील आरोपींची नावे आहेत. येथील चिंतामणी मंदिरानजीक कालव्याच्या पुलाखाली आशुतोष राठोड (२१) रा. दारव्हा याचा मृतदेह ३ जानेवारी २०१६ रोजी जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खुनामागे क्रिकेट की प्रेमप्रकरण या दिशेने पोलीस तपास करीत होते. मात्र प्रत्यक्षात खंडणीचे कारण पुढे आले. आशुतोष हा दारव्हा येथील मुंगसाजी महाविद्यालयाचा बीएस्सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. दारव्हा तालुक्यात आशुतोष राठोडचे क्रिकेटर म्हणून चांगले नाव होते. त्याला अनेक चषकेही मिळाली.
पोलीस सूत्रानुसार, आरोपी अक्षय तिरमारे व सौरभ दुर्गे हे पूर्वीपासूनचे मित्र आहे. मृतक आशुतोष त्यांना ओळखत होता. ते सोबत क्रिकेट खेळत असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. अक्षय हा दारव्ह्यात घर असूनही दीड महिन्यांपासून अभ्यासाच्या नावाने गावाबाहेर असलेल्या नातूवाडीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याच्या या रुमवर सौरभ व आशुतोष बरेचदा यायचे. त्यातून त्यांच्यात जीवलग मैत्री झाली. अक्षय हा खान्या-पिण्यात पैसे उडविणारा असल्याने त्याच्याकडे बऱ्याच लोकांची उधारी झाली होती. या उधारी वसुलीसाठी त्याच्याकडे तगादा लावला जात होता. त्यातूनच तो कुणाला तरी ‘शिकार’ करण्याच्या बेतात होता. माझे वडील दारव्हा तालुक्यातील पांढुर्णा येथे वसराम पाटील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, मात्र ते खर्च करीत नाहीत, अशी ओरड आशुतोष नेहमीच या दोन मित्रांकडे करायचा. त्यातूनच आशुतोषचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून किमान २० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा विचार अक्षयच्या डोक्यात आला. हा विचार त्याने सौरभकडे बोलून दाखविला. त्याची संमती मिळताच या दोघांनी आशुतोषच्या अपहरणाचा कट रचला. आशुतोष हा दारव्ह्यातील मैदानावर नित्यनेमाणे क्रिकेटची प्रॅक्टीस करण्यासाठी येत असल्याचे त्यांना माहीत होतेच. त्यांनी २ जानेवारी २०१६ रोजी आशुतोषला सायंकाळी गाडीवर बसवून रुमवर आणले. तेथे आशुतोष मोबाईलवर चॅटींग करण्यात व्यस्त असल्याचे पाहून अक्षयने मागून जाऊन नॉयलॉन दोरीने त्याचा गळा आवळला. यावेळी सौरभने त्याचे हातपाय घट्ट धरुन ठेवले होते. आशुतोष मरण पावल्याची खात्री पटल्यानंतर त्याला रुममध्येच अंगावर पांघरुन घालून झोपलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले. त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी गेले. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास दोघेही बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन रुमवर आले. घरमालकाच्या दाराला कुलूप असल्याचे पाहून त्यांनी आशुतोषचा मृतदेह मोटरसायकलवर मध्यभागी बसलेल्या अवस्थेत ठेऊन त्याला यवतमाळ रोडवर दारव्ह्यापासून दोन किमी अंतरावरील चिंतामणी मंदिरानजीक कॅनॉल रोडवर पुलाजवळून खाली फेकले. नंतर खाली जाऊन आशुतोषचे प्रेत पुलाखाली खेचून त्याला पेट्रोल टाकून पेटवून दिले.
इकडे आशुतोष घरी न आल्याने त्याचे मित्र व आई-वडिलांनी शोधाशोध चालविली होती. त्याच्या कुटुंबियांनी मित्र असल्याने अक्षयकडेही मोबाईलवरून चौकशी केली. म्हणून अक्षय घाबरला. सौरभला मुलांच्या होस्टेलवर सोडून अक्षय हा स्वत: आशुतोषच्या कुटुंबियांसोबत त्याच्या शोधमोहीमेत सहभागी झाला. सर्व काही तत्काळ झाल्याने त्याला खंडणीसाठी आशुतोषच्या वडिलांना फोन करण्याची संधीच मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी थेट आशुतोषचे प्रेतच पोलिसांना मिळाल्याने घाबरुन जाऊन त्याच्या वडिलांना खंडणीसाठी फोन करणे अक्षयने टाळल्याची माहिती आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आली आहे. सौरभ हा कळंब येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. तो यवतमाळ येथे नातेवाईकांकडे राहत होता. तर अक्षयने १२ वी नापास झाल्यापासून शाळा सोडली होती. घटनेनंतर अक्षय व सौरभ नागपूरला खासगी वाहनाने पळून गेले. अक्षयने मृतक आशुतोषचा मोबाईल बंद केला होता. त्यात त्याने स्वत:चे सीमकार्ड टाकले. त्यावर आलेला एक कॉल त्याने उचलला आणि तेथेच त्याचे लोकेशन डिटेक्ट झाले. पैसे संपल्याने नागपूरवरून ते एसटीने दारव्ह्यात परतले. मात्र अक्षयच्या वडिलांनी या दोघांना बसस्थानकावरच पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सांगण्यात येते. मात्र खुनातील आरोपींना यवतमाळातून अटक केल्याचा दावा पोलीस करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, उपनिरीक्षक सुगत पुंडगे, पोलीस कर्मचारी साजीद खान, सचिन हुमणे, आशिष चौबे, सुरेंद्र वाकोडे, सतीश गजभिये, सुमित पाळेकर आदींनी ही कामगिरी केली.
पोलिसांमध्ये श्रेयाची लढाई
खुनातील या आरोपींच्या अटकेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि दारव्हा पोलिसांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. दारव्हा ठाणेदार सूर्यकांत राऊत यांच्या मार्गदर्शनात फौजदार चौधरी यांनीच या आरोपींचा माग काढला. मात्र एलसीबी ही वरिष्ठ असल्याने त्यांनी संपूर्ण प्रकरण आपल्या ताब्यात घेऊन आम्हीच डिटेक्शन केल्याचा दावा वरिष्ठांपुढे व माध्यमांपुढे केल्याचा सुर आहे. (लोकमत चमू)
पहिल्या दिवशी दोरीअभावी हुकला गेम
आशुतोष राठोड याचे अपहरण करून त्याच्या मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा कट रचल्यानंतर १ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी त्याला क्रिकेटच्या मैदानावरून अक्षय व सौरभने गाडीवर बसवून रुमवर आणले होते. मात्र त्याचा गळा आवळून खून करण्यासाठी आवश्यक असलेली दोरी त्यांना भेटली नाही. त्यामुळे त्या दिवशी सोडून दिल्याने आशुतोषचा जीव वाचला. दुसऱ्या दिवशी मात्र तशाच पद्धतीने त्यांनी आशुतोषचा गेम वाजविला.
वाहन चोरीतही सहभाग, चार वाहने जप्त
आशुतोष राठोड या युवकाच्या खुनातील आरोपी अक्षय व सौरभ हे वाहन चोरीतही सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कामात त्यांना राहुल अरुण मदनकर (२०) रा. तरोडा ता. दारव्हा याची साथ मिळत होती. त्यांनी दारव्ह्याच्या मेनलाईनमधून स्प्लेन्डर प्लस, जयस्वाल वाईन शॉपसमोरुन पल्सर, यवतमाळच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलसमोरुन शाईन, बोदेगाव (नेर) येथून पॅशन प्रो अशा चार मोटर सायकली चोरल्या. पावणे दोन लाख रुपये किंमतीच्या या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पाचवी ईग्नीटर ही मोटरसायकल या आरोपींनी यवतमाळच्या पार्वती आॅटोमोबाईलसमोरुन चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. विशेष असे मदनकर याच्या घरी तीन महिन्यांपासून दुचाकी वाहने पडलेली होती. तो दारव्ह्यातच मोबाईलच्या दुकानात काम करीत असल्याने आपल्या मित्रांची, साहेबांची ही वाहने आहेत, असे त्याने घरी खोटे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना ही वाहने चोरीची असावी, असा संशयही आला नाही.