पोलिसांच्या मदतीसाठी साकारणार सायबर लॅब
By admin | Published: July 30, 2016 12:49 AM2016-07-30T00:49:26+5:302016-07-30T00:49:26+5:30
संपूर्ण पोलीस यंत्रणेचा तपास सायबर सेलवरच केंद्रित झाला आहे. जिल्ह्यातील ३१ ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या मोबाईल चोरीच्या
स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त : सोशल मीडियावर नियंत्रणासाठी अद्ययावत यंत्रणा
यवतमाळ : संपूर्ण पोलीस यंत्रणेचा तपास सायबर सेलवरच केंद्रित झाला आहे. जिल्ह्यातील ३१ ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यापासून तर आर्थिक, शरीर दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीचा माग काढण्यासाठी सायबर सेलकडेच धाव घेतली आहे. तपासाच्या या आधुनिक पध्दतीचा अवलंब करताना येथील यंत्रणा मात्र अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे. सायबर सेलचे स्वरूप बदलवून आता प्रत्येक जिल्हा मुख्यालयी सायबर लॅब तयार केली जात आहे. याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी केले जाणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर सेलमध्ये सध्या केवळ तीन कॉम्प्यूटर व तीन कर्मचारी आहेत. २४ तास सेवा देणाऱ्या या कक्षात सुविधेच्या अनेक उणिवा आहेत. तरीही अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर सेलचाच मोलाचा वाटा राहिला आहे. दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केवळ डमडाटा व डव्हीआ - सीव्हीआरच्या माध्यमातूनच उघड केले आहेत. फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचाही शोध घेण्यात सायबर सेलची महत्वाची भूमिका आहे. आज सायबर सेल पोलीस तपासातील सर्वात महत्वाचा घटक बनला आहे. आरोपींचे आॅनलाईन लोकेशन ट्रेस करून सायबर सेलच्या निर्देशावरूनच विविध तपास पथक आपली दिशा निश्चित करतात. इतका महत्वपूर्ण कक्ष अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता. आता पोलीस महासंचालकांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या सायबर सेलचे नूतनीकरण करून त्या ठीकाणी सायबरलॅब साकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तांत्रिक सहाय करणाऱ्या खासगी एजन्सीची मदत घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आता सायबर लॅबची स्वतंत्र इमारत तयार होणार आहे. त्यासाठी अधिक वेगवान संगणक आणि अॅडव्हान्स सॉफ्टवेअर पुरविले जाणार आहे. सायबर लॅबची कार्यक्षमता वाढवून गुन्हेगारांचा शोध लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यासाठी १२० कोटींचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.
यवतमाळातील सायबर लॅबच्या कामासाठी मुंबईतील पथकाने दोन दिवसांपूर्वीच पाहणी करून कामही सुरू केले आहेत. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियामुळे सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर नियंत्रणासाठी सायबर लॅबचा उपयोग होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)