पाणीदार गावांसाठी अंकितची सायकलस्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:55 PM2019-01-02T21:55:23+5:302019-01-02T21:56:00+5:30
दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.
राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग जमा झाले. हा दुष्काळ गावांना पाणीदार करण्यासाठी उत्तम संधी आहे. हाच धागा पकडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अंकित राधेश्याम जयस्वाल याने सायकलवारी सुरू करून गावोगावी जनजागृती करण्याचा वसा घेतला. तो एकूण ७६१ किलोमीटरची वारी करणार आहे. २०१९ ची वॉटर कप स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी गावांमध्ये जागृतीसाठी अंकीतने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सायकलवरून गावोगावी प्रबोधन करण्याचे काम तो करीत आहे.
वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथून त्याने मोहिमेला प्रारंभ केला. तो दररोज किमान १५० किलोमिटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये अंकीत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गावकºयांना करतो. दुष्काळाला संधी समजून आपले गाव पाणीदार करण्याबबात जागृती करतो. यात त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.
बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करणारा अंकीत बुधवारी कळंबमार्गे सायकलने यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला आहे. या दरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये त्याने पाणीदार गावांबाबत जागृती केली. आता तो मेहकर, औरंगाबाद, विंचुर, इगतपुरीमार्गे मुंबईला निघाला आहे. यात तो ७६१ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.
पाणी कमवा, प्रदूषण टाळा
आपण केवळ पाण्याचा वापर करतो. मात्र हे पाणी कमाविण्यासाठी प्रयत्न होत नाही. वॉटर कप स्पधेतून पाणी कमाविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात अंकीत जागृती करीत फिरत आहे. उद्याचा महाराष्ट्र संपन्न व्हावा, असा आपला उद्देश असल्याचे त्याने सांगितले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणीदार गाव चळवळ राबविली जात आहे. यावर्षी ८ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २२ मेपर्यंत गावकरी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. गावोगावी जागृती होत आहे.