यवतमाळात सिलिंडरचा स्फोट, तीन घरे खाक

By सुरेंद्र राऊत | Published: March 29, 2023 06:37 PM2023-03-29T18:37:24+5:302023-03-29T18:37:54+5:30

बुधवारी दुपारचा थरार, गोधनी मार्गावरील नवजीवन सोसायटीतील घटना

Cylinder explosion in Yavatmal, three houses damaged; Wednesday afternoon thrills | यवतमाळात सिलिंडरचा स्फोट, तीन घरे खाक

यवतमाळात सिलिंडरचा स्फोट, तीन घरे खाक

googlenewsNext

यवतमाळ : शहरातील अमोलकचंद महाविद्यालयाच्या बाजूला गोधनी मार्गावर झोपड्यांमध्ये अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पत्र्याची तीन घरे जळून राख झाली. यातच ऑटोरिक्षाचाही कोळसा झाला. अचानक काय झाले याचा अंदाज येण्याअगोदरच आगीने या घरांची राख केली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते.

रवी मोतीराम राठोड, अमोल देवतळे, श्यामराव कांबळे या तिघांनी गोधनी रस्त्याच्या बाजूला नाल्यालगत असलेल्या जागेत स्वत:चा निवारा उभा केला होता. टीन पत्र्याच्या घरात राहून रोजमजुरी करुन हे तीनही कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. रवि राठोड यांची फिरती रसवंती आहे. तर इतर दोघे रोजमजुरीची कामे करतात. संपूर्ण कुटुंबच घराला कुलूप लावून कामावर जाते. तीनही घरे बंद असताना अचानक गॅस गळती होवून सिलिंडर स्फोट झाला. नेमकी आग कशाने लागली हे स्पष्ट नसले तरी सिलिंडर स्फोट व गॅस गळती हा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. आगीचा डोंब अचानक उसळल्यानंतर एकच धावाधाव झाली. अग्नीशमन बंबाला बोलाविण्यात आले. तोपर्यंत मात्र सिलिंडरचा स्फोट होवून घराचे पत्रे वरुन गेलेल्या उच्च दाब वाहिनी वीज तारांवर जावून अडकले. यामुळे स्पार्किंग होवून वीज पुरवठाही बंद पडला.

सुदैवाने तीनही घरात एकही व्यक्ती नव्हता. त्यामुळे जिवीत हानी टळली. मात्र घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घरासमोर उभा असलेला ऑटोरिक्षाचीही राख झाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र टळटळीत उन्ह व एकाच वेळी उठलेली आग डोंब यामुळे कुणालाही काहीच करता आले नाही. अग्नीशमन बंब पोहोचल्यानंतर आगेत तपून लाल झालेले टीनपत्रे पाण्याने थंड करण्याचा प्रयत्न होता. आग इतरत्र पसरु नये म्हणून धूमसत असलेली राख व निखारे विझविण्यात आले. या आगीत तीन कुटुंब उघड्यावर आले आहे. आता त्यांच्याकडे साधा चम्मचही शिल्लक नाही. सायंकाळच्या भोजनाचा प्रश्न या कुटुंबापुढे उभा ठाकला आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. आगग्रस्तांची सांत्वना केली.

बघ्यांची जमली गर्दी

दुपारची वेळ असली तरी आग लागल्यानंतर मोठी गर्दी येथे जमली होती. सुरुवातीला काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस सिलिंडरचे स्फोट होवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. धाडसाने पुढे येवून आग विझविण्याची धडपड करण्यात आली. त्यात यश आले नाही. घरे जळून खाक झाली.

Web Title: Cylinder explosion in Yavatmal, three houses damaged; Wednesday afternoon thrills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.