बापरे...! उकणी खाणीत शिरले चार वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 05:00 AM2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:16+5:30
या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मध्यरात्रीनंतर १ वाजताची वेळ... खाणीतील एक कामगार डम्पर घेऊन पार्किंगकडे निघतो... पार्किंगजवळ पोहोचताच, अचानक एक वाघिण पुढे येते... त्या पाठोपाठ तिचे तीन बछडेही समोर येतात... हे दृश्य पाहताच, डम्पर चालक घाबरून जातो. मात्र, प्रसंगावधान राखून समाेरचे दृश्य आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करतो. ज्या ठिकाणी सदैव कामगारांची वर्दळ असते, अशा उकणी खाणीत गुरुवारी रात्री हा थरार घडला. एकाच वेळी चार वाघांचा वावर पाहून कामगारांमध्ये दहशत पसरली आहे.
या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत. उकणी खाणीत तीन शिफ्टमध्ये काम चालते. आजवर खाण परिसरात वाघाचा वावर होता. आता एक वाघिण थेट आपल्या बछड्यांसह खाणीत भटकत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
वणी परिसरात दिवसागणीक वाघांचा संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वणी तालुक्यातील मोहोर्ली, कोरंबी-मारेगाव, विरकुंड, रासा, बोर्डा, घोन्सा, सुकनेगाव, नेरडपुरड, पेटूर या भागांत अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. रासा शेतशिवारात तर दररोजच व्याघ्रदर्शन होत आहे. अद्याप वाघाने मानवावर हल्ले केले नसले, तरी पाळीव जनावरांच्या शिकारीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाघांची संख्या वाढल्याने या तालुक्यात मानव-वाघ संघर्ष चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वणी तालुक्यालगत चंद्रपूर जिल्हा आहे. त्यामुळे ताडोबातील वाघ सहजपणे वणी तालुक्यात प्रवेश करतात. या भागातून वाघांचा भ्रमणमार्गही गेला आहे. त्यामुळे वाघांची सातत्याने ये-जा सुरू असते. सोबतच केळापूर तालुक्यातील अभयारण्यही अगदी जवळ आहे. त्यामुळे तेथील वाघही झरी, तसेच वणी तालुक्यात येत आहेत.
झुडूपांमुळे वन्यजिवांसाठी सुरक्षित वातावरण
- उकणी खाणीलगत कोलार पिंपरी कोळसा खाण आहे. मात्र, गेले अनेक दिवसांपासून ही खाण बंद आहे. सोबतच या खाणीभोवती झुडपी जंगल आहे. त्यामुळे वन्यजिवांसाठी हा भाग अतिशय सुरक्षित असल्याने या भागात वाघांचा कायम वावर दिसून येतो.