बंदोबस्तातील जवान उपचाराविना दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:44 PM2019-02-15T23:44:21+5:302019-02-15T23:46:22+5:30
पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला. नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला.
नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली. येथे रिपोर्टींग करत असतानाच जवान सचिन सुरेश मेहर (३०) बक्कल क्रमांक ३८५ रा. पवनार वर्धा यांची प्रकृती बिघडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. व्हेंटीलेटरसोबत डायलिसीसची गरज असल्याचे मेडिकलच्या डॉक्टरांनी सांगितले. याची सुविधा यवतमाळात नसल्याने नागपूर येथे हलविण्याचा दुपारी ३ वाजता सल्ला दिला. मात्र अद्ययावत रुग्णवाहिका आणि त्यावर डॉक्टर नसल्याने सायंकाळचे सात वाजले. रुग्णसेवकांनी अधिष्ठाताकडे रुग्णवाहिकेवर डॉक्टर द्यावा, अशी मागणी केली. मात्र अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी व्हीआयपी बंदोबस्त असल्याने डॉक्टरांच्या चमू पांढरकवडा गेल्याचे सांगून असमर्थता दर्शविली. त्यानंतर रुग्णसेवकांनी एका खासगी डॉक्टरच्या मदतीने गुरूवारी रात्री सचिनला सावंगी मेघे येथे दाखल केले. मात्र विलंबामुळे त्यांची प्रकृती खालावली, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अशातच शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयीन प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. सचिन मेहर यांना दीड वर्षाची चिमुकली, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.