डेअरीमधील मिष्ठान्नाची तपासणीच नाही; भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:06 PM2024-10-08T17:06:23+5:302024-10-08T17:08:44+5:30
नागरिकांचे आरोग्य धोक्यात : दुकानांची तपासणी करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहर व तालुक्यात सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त मिष्ठान्न पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. पांढरकवडा शहर व ग्रामीण भागातील विविध स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विकण्यात येणाऱ्या मिष्ठान्न पदार्थांच्या शुद्धतेबाबत ग्राहकातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विकण्यात मिष्ठान्नाची तपासणीच करण्यात येत नाही आहे.
शासनाने प्रत्येक स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विक्री करण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत ते किती दिवस आधी तयार करण्यात आले. किती दिवसपर्यंत ते खाण्यायोग्य राहील, याचे फलक लावण्याचे आदेश दिले होते. परंतु, पांढरकवडा शहरातील अनेक दुकानांमध्ये मिष्ठान्न पदार्थांबाबत असे फलक दिसून येत नाही. मिष्ठान्नाची एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतरसुद्धा ते मिष्ठान्न ग्राहकांच्या माथी मारण्यात येत असल्याचे प्रकार येथे घडत आहे. ग्राहकांना कित्येक दिवसाआधी बनविण्यात आलेले पदार्थ विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरात दैनंदिन दुधापासून तयार करण्यात येणारे शेकडो किलोचे मिष्ठान्न विक्री करण्यात येत असते. सध्या नवरात्रौत्सव तथा सणासुदीचा काळ सुरू असल्याने मिष्ठान्न पदार्थांच्या विक्रीत दुप्पट, तिप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात गोधन नामशेष होण्याच्या मार्गावर असताना दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांसाठी दूध येते तरी कुठून?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहर व तालुक्यात बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचीच जास्त, तर स्वीट मार्ट तथा दूध डेअरी आहे. त्यांना तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यांशी काहीही देणे, घेणे नाही. ते फक्त पैसे कमविण्याकरिता केमिकलने तयार केलेले भेसळयुक्त मिष्ठान्न व पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे, परंतु याकडे लक्ष देण्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी तयार नाही.
"पांढरकवडा तालुक्यातील दुकानांची तपासणी करणे सुरू आहे. तपासणीत काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल."
- एस.आर. सूरकर, अन्न सुरक्षा अधिकरी, यवतमाळ