९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
By रूपेश उत्तरवार | Published: July 25, 2022 10:28 AM2022-07-25T10:28:47+5:302022-07-25T10:35:31+5:30
राज्यात अतिवृष्टीने नऊ लाखांपेक्षा जादा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे; परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत.
रुपेश उत्तरवार
यवतमाळ : अतिवृष्टीने संपूर्ण राज्यभरात हाहाकार उडाला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांंचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तथापि, नैसर्गिक आपत्तीमधील मदतीच्या निकषात सधअयातरी कुठलेही बदल झालेले नाहीत. यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६८०० रुपयांची मदत मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, या निकषाने झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
राज्यात अतिवृष्टीने नऊ लाखांपेक्षा जादा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ३० जुलैपर्यंत नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार करायचा आहे; परंतु सततच्या पावसाने अंतिम पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त पथक पंचनामे करीत आहे. पावसाने शेतातील पीक आणि सुपीक माती वाहून गेली. पुढील अनेक वर्षे पीक उभे राहणे अवघड आहे. यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
२०१५ च्या निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत देण्याच्या सूचना आहेत. वाढती महागाई आणि झालेले नुकसान पाहता ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरणार आहे. नवीन राज्य सरकारकडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा आहे; मात्र अद्याप मदतीबाबत निर्णय झालेला नाही.
मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका
कृषी विभागाच्या अहवालानुसार पावसामुळे सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात झाले आहे. तेथे दोन लाख ९७ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाने घेतली. एक हजार हेक्टरवरील जमीन खरडून गेली. या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्याला फटका बसला. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. सर्वेक्षणाअंती हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात एक लाख ३१ हजार हेक्टर, नागपुरात २८ हजार हेक्टर, भंडाऱ्यात १९ हजार हेक्टर, हिंगोली १५ हजार ३०० हेक्टर, गडचिरोली १२ हजार हेक्टर, बुलडाणा सात हजार हेक्टर, अकोला ८६४ हेक्टर, नाशिक दोन हजार हेक्टर, पुणे १८०० हेक्टर, नंदूरबार १९१ हेक्टर, रायगड १०५ हेक्टर, गोंदीया ५५ हेक्टर, ठाणे २० हेक्टर, वाशिम १० हेेक्टर, सांगली आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी २ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ऑगस्टमध्ये नुकसानीचे वास्तव पुढे येणार
सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेला अडचणी येत आहेत. परिणामी अहवाल तयार होण्यास विलंब लागणार आहे. ऑगस्टपर्यंत नुकसानीचा खरा अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.
सर्वाधिक बाधित गावे यवतमाळात
पूर परिस्थिती निर्माण होऊन यवतमाळ जिल्ह्यातील १०४१ गावे बाधित झाली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. जवळपास एक लाख ४५ हजार शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा मदत कार्यात गुंतली आहे.